रत्नागिरी ः मुख्यमंत्री दहिहंडीत व्यस्त,गणपतीत फिरले गरागरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  मुख्यमंत्री दहिहंडीत व्यस्त,गणपतीत फिरले गरागरा
रत्नागिरी ः मुख्यमंत्री दहिहंडीत व्यस्त,गणपतीत फिरले गरागरा

रत्नागिरी ः मुख्यमंत्री दहिहंडीत व्यस्त,गणपतीत फिरले गरागरा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat16p14.jpg- रत्नागिरी- शिवसेनेने संवादनिष्ठा यात्रेनिमित्त रत्नागिरीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
-rat16p15.jpg- जनसमुदायाला संबोधित करताना शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आणि व्यासपीठावरील मान्यवर.
------

मुख्यमंत्र्यांना जनतेशी देणे-घेणे नाही

आदित्य ठाकरे; आम्ही पुढे नेलेला महाराष्ट्र मागे खेचला

रत्नागिरी, ता. १६ ः राज्यातून वेदांता फॉक्सकॉनसह आणखी काही प्रकल्प गेले. कर्नाटक, गुजरात, तेलंगणामध्ये हे घडले असते, तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता; परंतु तात्पुरते आणि डबल इंजिनच्या या सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आम्ही पुढे नेलेला महाराष्ट्र त्यांनी मागे खेचला. मुख्यमंत्री आधी दहीहंडीत व्यस्त होते, नंतर गणपतीमध्ये गरागरा फिरले, आता नवरात्रोत्सवात व्यस्त असतील. त्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. आतातरी त्यांनी राज्यातील प्रकल्प, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष द्यावे, असा हल्लाबोल शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि शिंदे सरकारवर केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना प्रकल्प गेल्याची कल्पना नसणे यासारखी दुर्दैवी बाब नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. संवादनिष्ठा यात्रेनिमित्त रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील सभेत त्यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. या यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
ठाकरे म्हणाले, ‘हा उत्साह पाहून मी खात्री देऊ शकतो की, ज्या ठिकाणी गद्दारी झाली, तेथे पुन्हा एकदा शिवसैनिक जिंकून येणारच. महिलांनी उद्धव ठाकरेंमध्ये विश्वासू माणूस आणि कुटुंबातील मुख्यमंत्री पाहिला, म्हणून महिलावर्ग त्यांच्यामागे ठाम उभा आहे. जिथे जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तेथे मला जनतेचा कौल पाहिजे. जे काही घाणेरडे राजकारण झाले, ते तुम्हाला पटले का? तुम्ही आमच्याबरोबर आहात का, माझ्या यात्रेची गर्दी पाहिल्यानंतर आता फोन यायला लागले, निरोप येऊ लागले की गद्दार बोलू नका. विश्वासघातकी आणि गद्दारात काही फरक आहे का? ५० खोके एकदम ओके. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, अशी या गद्दारांची स्थिती आहे. हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. होऊन जाऊ दे, मग जनता तुम्हाला जागा दाखवून देईल. ४० आमदारांऐवजी ४१ आमदारांची निवडणूक घ्या. मी पण राजीनामा देतो, असे आव्हान त्यांनी दिले. या वेळी खासदार विनायक राऊत, अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
------------------------------------

उद्योगांबाबत मंत्री अनभिज्ञ

ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील उद्योगांची मंत्र्यांनाच माहिती नाही याची लाज वाटते. वेदांता फॉक्सकॉन, बल्टपार्क यापैकी एकही प्रस्ताव आताच्या उद्योगमंत्र्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री कोण हेच माहिती नाही. डबल इंजिन सरकार आहे. यांनी आमच्याशीच नाही, तर महाराष्ट्राशी गद्दारी केली.’ तुम्ही कोणाबरोबर शिवसेना की खोके सरकारबरोबर, असे त्यांनी विचारता कार्यकर्त्यांनी सेनेबरोबर, असा हात वर करून सेनेच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला.
------------------------------

केंद्रावर टीका करणार नाही
ठाकरे म्हणाले, कोण कुठे जातोय, हे महत्त्वाचे नाही. कोणाचे सरकार हे महत्त्वाचे नाही; पण आपण तरुणांना किती रोजगार दिले हे महत्त्वाचे आहे. केंद्राने काही प्रकल्प दिले; परंतु ते सरकारला महाराष्ट्रात थांबवता आले नाहीत. त्यामुळे केंद्रावर टीका करणार नाही. आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक केली. आपण गुंतवणूक आणू शकतो, मग तुम्ही आणू शकत नाही का? अनेक मंत्र्यांना बंगले मिळाले, पदे घेतली; परंतु महाराष्ट्रात पालकमंत्री झालेले नाहीत.
--------------

गद्दारीला क्रांती समजू लागले
शिंदे गटावर ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, त्यांनी फक्त पक्षाशी नाही, तर माणुसकीशी गद्दारी केली. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा ४० गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला. यांना शिवसेनेने काय कमी केले, का गद्दारी केली, काय चुकले आमचे? काही दडपणे होती का? ईडीचे दडपण होते का? मग सांगायला पाहिजे होते. हिंमत दाखवायला हवी होती. निधड्या छातीने त्याला सामोरे जायला पाहिजे होते; परंतु हे गद्दार पळून गेले. गद्दारीला हे क्रांती समजू लागले.
----------

हे हिंदुत्ववादी सरकार का...?
हिंदुत्ववादी सरकार म्हणता मग साधूंना मारहाण झाली, सरकारने काय केले? हे हिंदुत्ववादी सरकार, बालाजीचे मंदिर मुंबईत आणणार होते, त्याला स्थगिती दिली. मग हे हिंदुत्ववादी सरकार कसे? असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96795 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..