प्रदुषणाच्या शक्यतेमुळे जहाजावर करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदुषणाच्या शक्यतेमुळे 
जहाजावर करडी नजर
प्रदुषणाच्या शक्यतेमुळे जहाजावर करडी नजर

प्रदुषणाच्या शक्यतेमुळे जहाजावर करडी नजर

sakal_logo
By

५०७९०
विजयदुर्ग ः येथील बंदरासमोर दुर्घटनाग्रस्त झालेले ‘पार्थ’ जहाज.

प्रदूषणाच्या शक्यतेमुळे
जहाजावर करडी नजर
विजयदुर्गजवळ समुद्रात ‘पार्थ’ बुडण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
देवगड/ओरोस, ता. १७ ः तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात अपघातग्रस्त झालेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचे प्रदूषण सुरू झालेले नाही; मात्र या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजामुळे समुद्रातील पाण्यावर तेलाचा तवंग पसरला आहे काय, याची आज तालुका प्रशासनाने समुद्रात गस्ती नौकेच्या साहाय्याने पाहणी केली. जहाजामध्ये तेलाचे कंटेनर असून, अद्यापपर्यंत समुद्राच्या पाण्यात तेल दिसत नसल्याची प्राथमिक माहिती नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी दिली. असे असले तरी जहाज बुडण्याची शक्यता यंत्रणांकडून वर्तवली जात आहे.
विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात सुमारे ४० ते ४५ वाव अंतरावरील पाण्यात ‘पार्थ’ नावाचे एक तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. जहाजाची लांबी सुमारे १०१.९ मीटर लांबी, १६ मीटर रुंदी, तर ८ मीटर खोली आहे. जहाजामधील कार्गो टाकीची वहन क्षमता ४६२९.७५३ घनमीटर इतकी असून, सद्यस्थितीत ३९११ टन वाहतूक सुरू होती. जहाज नऊ सप्टेंबरला दुबईहून निघून मंगळूरच्या दिशेने निघाले होते. शुक्रवारी सकाळी जहाज अपघातग्रस्त होत असल्याचे जहाजावरील माणसांच्या लक्षात आले. जहाजाच्या खालच्या भागातून वेगाने पाणी भरत होते. यामुळे त्यांनी तातडीने मुंबईतील सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. तेथून तातडीने रत्नागिरी येथील तटरक्षक दलाला संदेश देण्यात आला. तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ आणि ‘अपूर्वा’ अशा दोन नौका बचावासाठी पाठवण्यात आल्या. सुरक्षितता म्हणून हेलिकॉप्टर तैनात होते. जहाजावरील सर्व १९ व्यक्तींना तटरक्षक दलाकडून वाचविण्यात आले. यामध्ये एक इथोपियन, तर १८ भारतीय होते.
जहाज बुडण्याची शक्यता तटरक्षक दलाकडून वर्तवण्यात आली. त्यामुळे परिसरातून जाणाऱ्‍या अन्य जहाजांना सुरक्षितता म्हणून तटरक्षक दलाने सावध केले; मात्र तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्रात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गस्तीनौकेच्या साहाय्याने नायब तहसीलदार ठाकूर, पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, मालवणचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर आदींनी समुद्रात पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त नौकेवर तेल वाहतुकीचे कंटेनर आहेत; पण अद्याप समुद्राच्या पाण्यात तेल मिसळलेले आढळून आले नसल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले. स्थानिक मच्छीमारांनी याबाबत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन मालवणकर यांनी केले आहे. दरम्यान, देवगड, मालवण व वेंगुर्ले येथील परवाना अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याबाबत आदेश आहेत. प्रशासनाने जहाजाच्या मालकाला याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे.

जहाजात भरला डांबराचा साठा
जहाजात सद्यस्थितीत डांबर साठा आहे. तो पाण्याच्या तळाशी जाऊन बसणार आहे. त्यामुळे तेल गळतीचा धोका कमी असल्याचे वेंगुर्ले प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र तेल गळती झाली किंवा कसे, याचा अहवाल देण्याची सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळास दिल्याचे सांगितले. रत्नागिरीचे कमाडंट कोस्ट गार्डची यंत्रणा या जहाजावर लक्ष ठेवून आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून केले आहे.


कोस्टगार्डची नजर
तेलवाहू जहाज असल्याने जहाजातून तेल गळती झाल्यास विजयदुर्ग ते मालवण भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे; मात्र अशी तेल गळती झाल्यास त्यावर त्वरित उपाययोजनेसाठी कोस्ट गार्डचे एक जहाज २४ तास निरीक्षण करीत आहे. तेल गळती होऊन तेल समुद्र किनाऱ्‍यावर येऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97121 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..