‘लोकराजा’च्या स्मृतींना नेरुरमध्ये ‘सलाम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकराजा’च्या स्मृतींना नेरुरमध्ये ‘सलाम’
‘लोकराजा’च्या स्मृतींना नेरुरमध्ये ‘सलाम’

‘लोकराजा’च्या स्मृतींना नेरुरमध्ये ‘सलाम’

sakal_logo
By

50807
नेरूर ः (कै.) सुधीर कलिंगण सेवा समर्पित सोहळ्यात दाखले देताना सीईओ प्रजित नायर. शेजारी बिडीओ विजय चव्हाण, सरपंच शेखर गावडे आदी.

‘लोकराजा’च्या स्मृतींना नेरुरमध्ये ‘सलाम’

सेवा पंधरवड्याचा प्रारंभ; आगळ्यावेगळ्या उपक्रमाने सीईओ भारावले

कुडाळ, ता. १७ ः राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा प्रारंभ सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर असणाऱ्या नेरूर गावातील लोकराजा दशावतार (कै.) सुधीर कलिंगण सेवा पंधरवडा समर्पित सोहळ्याने त्यांच्या नेरूर निवासी झाला. या सेवेने लाडक्या लोकराजाच्या स्मृतींना सलाम करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर भारावून गेले.
ग्रामपंचायत तसेच अन्य शासकीय कार्यालये यांच्याकडील प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. कुडाळ पंचायत समिती व नेरूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या सेवा पंधरवडाचा प्रारंभ आज लोकराजा (कै.) सुधीर कलिंगण यांना समर्पित करण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान’ त्यांच्या निवासी आयोजित केले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच शेखर गावडे, माजी सरपंच चारु देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा लोककला समिती अध्यक्ष राजा सामंत, पोलिस पाटील गणपत मेस्त्री, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, राजू खेत्री, संजय ओरोसकर, ग्रामविकास अधिकारी वासुदेव कसालकर, राजू कलिंगण, सिद्धेश कलिंगण, कौस्तुभ कलिंगण, भक्ती नेरुरकर, मयूर गवळी, चंदू खोत, मंजुनाथ फडके, कलिंगण परिवार उपस्थित होता.

यावेळी नायर म्हणाले, ‘‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा प्रारंभ लोकराजा दशावतार (कै.) सुधीर कलिंगण सेवा समर्पित सोहळ्याने दिमाखात झाला. लोकराजा कलिंगण यांची कला पाहण्याचा योग आला नाही; मात्र वृत्तपत्रांतून त्यांच्या कलेबद्दल खूप ऐकून होतो. पंधरवडा सेवेचा प्रारंभ त्यांच्या निवासस्थानी झाल्याने हा निश्चितच कौटुंबिक सोहळा असल्याचे जाणवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार, कळसूत्री बाहुली व इतर लोककला, परंपरा कलांच्या माध्यमातून टिकवून ठेवण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध उपक्रमांचा संदेश या कलांतून वेळोवेळी पोचविण्यात आला आहे. अशा प्रकारचे उपक्रम अन्य कोणत्याही जिल्ह्यात पाहता आले नाहीत. बिडीओ, सरपंच व त्यांच्या टीमने हा स्तुत्य उपक्रम राबविला.’’
बिडीओ चव्हाण म्हणाले की, दशावतार लोककलेची मनोभावे सेवा कलिंगण कुटुंबीय गेली तीन पिढ्या करत आहेत. त्यांची ही सेवा पंधरवडा सेवेच्या माध्यमातून त्यांना समर्पित करून हा कौटुंबिक सोहळा साजरा केला. या पंधरा दिवसांतील कामे २ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायची असतात; मात्र नेरूर ग्रामपंचायतीने हे अभिमान एकाच दिवसात पूर्ण करून विविध प्रकारचे १४ अर्ज निकाली काढले. त्यामुळे असा उपक्रम राबवणारी नेरूर-देऊळवाडा ही जिल्ह्यात एकमेव ग्रामपंचायत ठरली. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
..............
चौकट
मरणोत्तर पुरस्कारासाठी प्रयत्न
कोकणची दशावतार लोककला सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. जिल्ह्यात अनेकांना शासन दरबारी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. तशाच प्रकारे शासन दरबारी लोकराजा सुधीर कलिंगण यांना मरणोत्तर पुरस्कार मिळावा, यासाठी आमचा पाठपुरावा असणार असल्याचे बिडीओ चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97145 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..