राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना सावंतवाडीत मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating
राष्ट्रवादी तालुकाध्यक्षास मारहाण

राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना सावंतवाडीत मारहाण

सावंतवाडी : व्हॉटस् ॲपच्या ग्रुपमधून काढल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा प्रकार आज सायंकाळी घडली. याप्रकरणी सावंतवाडी मनसे शहराध्यक्षासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात
दळवी यांना मारहाण झाल्याचे समजताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनीही पोलिस ठाणे गाठत निरीक्षक मेंगडे यांच्याशी चर्चा केली व संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

व्हॉटस ॲप ग्रुपवर झालेल्या वाद-विवादानंतर व्यापारी असलेल्या मनसेच्या एका कार्यकर्त्याला ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून हा प्रकार झाला. याबाबत दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सावंतवाडी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचा व्हॉटस्‌ ॲप ग्रुप असून, यामध्ये पुंडलिक दळवी यांच्यासह मारहाण करणाऱ्या युवकाचा समावेश आहे. संबंधित युवक ग्रुपमध्ये वारंवार चुकीचे संदेश पाठवत असल्याचा दावा करीत दळवी यांनी काही दिवसांपूर्वी त्याला ग्रुपमधून काढून टाकले होते. याच रागातून त्या युवकांने काहींना सोबत घेऊन दळवी यांना उभाबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात गाठून जाब विचारला. ग्रुपमधून का बाहेर काढले, असा सवाल केला. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यातूनच त्याने दळवी यांच्या शर्टाला हात घालत मारहाण केली.

मारहाण करणाऱ्यासोबत काही कार्यकर्ते होते. ते, मनसेशी संबंधित असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. या सगळ्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. घटनेनंतर दळवी यांनी मारहाण झालेल्या अवस्थेत पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासमोर कैफियत मांडली. यात त्यांनी आपणास कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सोनसाखळी तोडण्यात आल्याची तक्रार दिली आहे. श्री. मेंगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. या प्रकरणातील संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, दळवी कार्यालयात बसले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचा वापर करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी दळवी यांच्यावर हल्ला केला. या लोकांचा पूर्व इतिहास तपासून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली. असा प्रयत्न पुन्हा केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे सामंत म्हणाले.

भाजपने केली कारवाईची मागणी
दळवी यांना मारहाण झाल्याचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अॅड. अनिल निरवडेकर, हेमंत बांदेकर आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात दळवी यांची भेट घेत घटनेची चौकशी केली. परब म्हणाले, ‘या घटनेचा मी निषेध करतो. अशी वृत्ती लगेच चिरडली पाहिजे. असे प्रकार होत असतील तर भीतीच वातावरण निर्माण होईल.’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97198 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..