Digital Transactions : डिजिटल व्यवहारांमुळे पाकिटमार गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due to digital transactions reduce crime of wallet theft
रत्नागिरी ः डिजिटल व्यवहारांमुळे पाकिटमार गायब

Digital Transactions : डिजिटल व्यवहारांमुळे पाकिटमार गायब

रत्नागिरी : देशात डिजिटल क्रांती घडत असल्याने बहुतांशी व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले आहेत. अगदी ग्रामीण भागातही हे तंत्रज्ञान पोहोचले आहे. त्यामुळे टपरीपासून ते मॉलपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार हे डिजिटल झाले आहेत. त्यामुळे खिशात रोकड किंवा पाकीट ठेवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. याचा मोठा परिणाम पाकिटमारांवर म्हणजे हात की सफाई दाखवणाऱ्यावर झाला आहे. डिजिटल व्यवहारांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये पाकिटमारीचे गेल्या चार वर्षांमध्ये फक्त १० गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी हे प्रमाण वर्षाला ४० ते ५० च्या वर होते. गर्दीचा फायदा घेत हातकी सफाई दाखवणारे अनेक चोरटे बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा कोणताही उत्सव, मेळावा आदींमध्ये दाखवायचे. त्यामुळे पाकिटमारीच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत होत्या.

आठवडा बाजारांमध्ये तर या पाकिटमारांचा सुळसुळाट असायचा. त्यामुळे प्रत्येक शनिवारी पोलिसांचा आठवडा बाजारात चोख बंदोबस्त असायचा. वेशांतर करून पोलिस असायचे. परजिल्ह्यातून हे पाकिटमार येऊन हातकी सफाई दाखवून निघून जायचे. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल होण्यात विलंब व्हायचा. काही वर्षांपूर्वी नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांच्या समर्थकांच्या गर्दीमध्ये शिरून चोरट्यांनी सोनसाखळ्या लांबवल्या होत्या. वारंवार असे प्रकार घडत होते. देशात आता डिजिटल क्रांती झाल्यामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खिशात रोकड व पाकीट ठेवणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने पाकिटमारीचे प्रमाण कमी झाले आहे.

डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण भागातही तंत्रज्ञान पोहोचले आहे. त्यामुळे टपरीपासून ते मॉलपर्यंत डिजिटल व्यवहार होऊ लागले आहेत. खिशात रोकड व पाकीट ठेवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा मोठा परिणाम पाकिटमारीवर झाला आहे. हातकी सफाई दाखवण्यासाठी आता लोक खिशामध्ये रोकडच ठेवत नाहीत. गुगल पे, फोन पे, क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट केली जातात. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या ४ वर्षांमध्ये पाकिटमारीच्या केवळ १० घटना घडल्या आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे चोरट्यांना लोकांच्या पाकिटातं काहीच मिळत नाही. काही महिन्यांपूर्वी बसमधून जाणाऱ्या महिलेची पर्स हिसकावून तिच्या पर्समधील रोख रक्कम चोरणाऱ्या चोराला काही तासातच पोलिसांनी पकडले व त्यामुळे चोरीला गेलेली सर्वच रक्कम परत मिळाली. चार वर्षांमध्ये पाकिटमारीच्या १० घटना घडल्या त्यापैकी ४ चोऱ्या उघड झाल्या असून उर्वरित सहा चोऱ्यांचा पोलिसांकडून छडा लावण्याचे काम सुरू आहे.

पाकिटमारीच्या घटना
वर्ष पाकिटमारीचे प्रकार
२०१९ --- ५
२०२० --- ००
२०२१ --- ४
२०२२ (जुलैपर्यंत) --- १

सोनसाखळी चोर वाढले
एकीकडे पाकीट चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी दुसरीकडे सोनसाखळी व पर्स चोरीच्या घटना वाढल्या आहेत. २०२१ मध्ये १७ घटना घडल्या तर चालू वर्षात २ घटना घडल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. १७ घटनांपैकी ८ घटना उघड करून १५ संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. चालू वर्षात २ घटना घडल्या असून त्या उघड झाल्या आहेत.

दीड वर्षामध्ये फक्त ५ प्रकार
जिल्ह्यात २०२१ ते २२ या एक वर्षात पाकिटमारीच्या पाच घटना घडल्या आहेत. गेल्या ५-६ महिन्यात १ घटना घडली आहे. डिजिटल व्यवहाराचे हे परिणाम असून, या गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे.

डिजिटलायझेशनमुळे सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगार बसल्या जागी हजारो व लाखो रुपये कमावतात. ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे; मात्र त्यामुळे पाकीटमारीचे प्रकार नक्कीच कमी झाले आहेत.
- डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97356 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..