‘लम्पी’बाबत सतर्कता; लसीकरणावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लम्पी’बाबत सतर्कता; लसीकरणावर भर
‘लम्पी’बाबत सतर्कता; लसीकरणावर भर

‘लम्पी’बाबत सतर्कता; लसीकरणावर भर

sakal_logo
By

51778
मालवण ः येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेली आढावा बैठक.


‘लम्पी’मुळे सतर्कता; लसीकरणावर भर

डॉ. आर. बी. दळवी ः मालवणात आढावा, शनिवारपर्यंत जिल्ह्यासाठी २५ हजार डोस

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : गाय, बैल आदी जनावरांमध्ये पसरणारा ‘लम्पी स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नाही. तरीही खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध १० हजार डोस तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहेत. अधिक २५ हजार डोस शनिवारपर्यंत उपलब्ध होतील. उर्वरित ७० हजार डोस नजीकच्या काळात उपलब्ध होतील. त्यानुसार नियोजन करून जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. मालवण तालुक्यालाही १ हजार डोस उपल्बध आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. दळवी यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जनावरांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आजाराचा कोणताही प्रादुर्भाव नाही. तरीही खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा तालुका सनियंत्रण समिती अध्यक्ष अजय पाटणे यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दळवी, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. वाय. डी. गोसावी, पशुधन विकास अधिकारी डॉ. टी. एस. वेर्लेकर आदी उपस्थित होते. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर जनावरांचे बाजार, जनावरांची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणारी वाहतूक यावर शासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यानुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन तपासणी नाक्यांवर दक्ष राहण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत तरी ''लम्पी''चा प्रभाव नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही; मात्र सतर्कता पाळावी. जर कुठे या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले.
..............
कोंबड्या, बकऱ्यांना धोका नाही
लम्पी डिसीज हा विषाणूजन्य आजार आहे. हा एका व्हायरसमुळे पसरतो. यात जनावराला सर्वप्रथम ताप येतो. त्यानंतर जनावराच्या अंगावर गाठी येतात. त्या काही दिवसांनी फुटतात. त्यातून स्त्राव वाहतात, त्यातून हा पसरतो. गोचिड, माश्या व मच्छर या आजाराचे वाहक ठरतात. हा आजार गाय आणि बैल या दोन जनावरांमध्ये राज्यात काही ठिकाणी दिसून आला. म्हैस या जनावरांमध्ये हा आजार नाही. तसेच दूध पिल्यामुळे कोणताही धोका नाही. याबरोबरच कोंबड्या व बकऱ्यांमध्येही हा आजार पसरत नाही, अशी माहिती डॉ. दळवी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98462 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..