वृद्धांना हेरून लुटण्याचा शहरात दुसरा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धांना हेरून लुटण्याचा शहरात दुसरा प्रकार
वृद्धांना हेरून लुटण्याचा शहरात दुसरा प्रकार

वृद्धांना हेरून लुटण्याचा शहरात दुसरा प्रकार

sakal_logo
By

वृद्धांना हेरून लुटण्याचा
शहरातील दुसरा प्रकार
अज्ञात संशयितांवर गुन्हा; महिलेचे ६० हजाराचे दागिने लंपास, शहर पोलिसांपुढे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ः शहरात वृद्धांना हेरून लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. सोमवारी एका वृद्धाला २ लाखाला लुटल्याची बातमी ताजी असताना मंगळवारी (ता. २०) एका वृद्ध महिलेला पोलिस असल्याची बतावणी करून तिच्याकडील ६० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास माळनाका येथील शिर्के हायस्कूलसमोर घडली. शहर पोलिसात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून फसवणूक करणाऱ्या या टोळक्याला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
या प्रकरणी सुलभा मारुती पवार (वय ६५, रा. बौद्धवाडी -फणसवळे, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, मंगळवारी (ता.२०) दुपारी सुलभा पवार आपल्या नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना शाळेत सोडल्यानंतर त्या मुलीसोबत बँकेत जाण्यासाठी मुलीची वाट बघत शाळेसमोरील झाडाखाली बसल्या होत्या. त्या वेळी त्यांना दोन अज्ञात त्यांच्या दिशेने येताना दिसले. त्यातील एकजण त्यांच्याजवळ आला तर एक रस्त्याच्या पलीकडेच थांबला. जवळ आलेल्या माणसाने मी पोलिस असून पलीकडे असलेले आमचे मोठे साहेब असून त्यांनी तुम्हाला बोलावले असल्याचे सांगितले.
सुलभा पवार यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिथे गेल्या. तेव्हा रस्त्याच्या पलीकडे असलेल्या संशयिताने आज सकाळी इथे खून झाला असून गेल्या दोन ते चार दिवसात चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे तुम्ही अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवा असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पवार यांनी अंगावरील सोन्याच्या बांगड्या आणि माळ काढून त्याने दिलेल्या कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवले. त्यानंतर संशयिताने पवार यांच्या पर्समध्ये हात घालून दागिने व्यवस्थित ठेवले ना असे विचारले अन निघून गेला.
सायंकाळी चारच्या सुमारास सुलभा पवार यांनी पर्समधील दागिने घालण्यासाठी बाहेर काढले असता कागदात त्यांच्या सोन्याच्या दागिन्याऐवजी प्लास्टिकच्या दोन बांगड्या आणि दगड होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी (ता.१९) सकाळी एका वृद्धाला दोन संशयितांनी भुरळ घालून २ लाखांचे दागिने लांबवले होते. त्यामुळे शहरात अशा प्रकारे वृद्धांना हेरून त्यांना लुटणारे टोळके सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98467 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..