विजयदुर्गपासून मालवणपर्यंत तेल तवंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्गपासून मालवणपर्यंत तेल तवंग
विजयदुर्गपासून मालवणपर्यंत तेल तवंग

विजयदुर्गपासून मालवणपर्यंत तेल तवंग

sakal_logo
By

सुधारित
-------------
51800
मिठमुंबरी : येथील समुद्र किनारी बुधवारी तटरक्षक दलाकडून पाहणी तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

विजयदुर्गपासून मालवणपर्यंत तेल तवंग
‘पार्थ’ जहाज दुर्घटना; वेंगुर्ले रॉक्सच्या दिशेने प्रदूषण प्रवास
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजाच्या अपघातानंतर समुद्रात प्रदूषणाचे संकट गड़द होताना दिसत आहे. आज
तेलाचा तवंग मालवण ते विजयदुर्गदरम्यान समुद्रात ७-८ नॉटिकल मैलपर्यंत पसरल्याचे तटरक्षक दलाच्या पाहणीत स्पष्ट झाले. वेंगुर्ले रॉक्सच्या दिशेने दक्षिण-पश्चिम भागात तवंग पुढे सरकत आहे. ही माहिती रत्नागिरी तटरक्षक दलाने दिली. प्रशासनाने किनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
तेल वाहतूक करणारे ‘पार्थ’ जहाज काही दिवसांपूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. जहाज तीन दिवसांपासून समुद्रात बुडालेल्या अवस्थेत आहे. घटनास्थळी काही तज्ज्ञांचे पथक २४ तास काम करीत आहे. अद्याप तेल किनाऱ्यावर आलेले नाही. आलेच तर तवंग थेट किनाऱ्यावर येऊ न देता त्याला समुद्रातूनच बाहेर कसे काढता येईल आणि तेल किनाऱ्यावर आलेच तर त्याला कशाप्रकारे वाळूतून सुरक्षितरीत्या बाहेर काढावे, या संदर्भात प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन कणकवलीच्या प्रांत वैशाली राजमाने यांनी केले आहे.
तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगडसमोरील खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या किनारपट्टी भागात सुरक्षितता म्हणून प्रशासनाने आज येथे बैठक घेतली. त्यात प्रांत राजमाने, तटरक्षक दलाचे डेप्युटी कमांडर सचिन सिंह उपस्थित होते. यावेळी समुद्रात तेलगोळे आढळल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.
यावेळी राजमाने म्हणाल्या, ‘‘तेल वाहतूक करणारे पार्थ जहाज दुर्घटनाग्रस्त असून, त्यामुळे जी संभाव्य आपत्ती येऊ शकते, या पार्श्वभूमीवर कोस्टल गार्ड रत्नागिरीचे कमाडंट यांनी देवगड येथे भेट दिली आहे. सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा कशाप्रकारे काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन केले आहे. घटनास्थळीही उपाययोजना सुरू आहेत. सर्व यंत्रणांनी समुद्र किनाऱ्यालगत तेल आले किंवा तेल येऊ नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रत्येक यंत्रणांचा आढावा घेतला आहे.’’
डेप्युटी कमाडंट सिंह म्हणाले, ‘‘जहाजामुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीची पाहणी केली आहे. परिस्थितीवर तज्ज्ञ लक्ष ठेवून आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. तेल गळतीमुळे होणारे दुष्पपरिणाम टाळता येण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात आज आपत्तीबाबतची प्रात्यक्षिकेही प्रशासनासोबत आयोजित केली होती. संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज आहे.’’

आज तातडीची बैठक
समुद्रातील दुर्घटनाग्रस्त जहाजातील तेलगळती किनाऱ्यावर पोहोचल्यास कोणती काळजी घ्यावी, यासाठी तालुक्याच्या किनारपट्टी भागातील सरपंच, ग्रामसेवक यांची उद्या (ता. २२) तातडीची बैठक घेऊन जागृती केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणती दक्षता घेतली जावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


00000

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98555 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..