ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खुन झाल्याचा संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खुन झाल्याचा संशय
ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खुन झाल्याचा संशय

ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खुन झाल्याचा संशय

sakal_logo
By

51806
कीर्तिकुमार कोठारी

ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा
रत्नागिरीत खून झाल्याचा संशय
१२ लाखांचा ऐवज चोरीस; सुवर्णकारासह तिघे संशयित ताब्यात
रत्नागिरी, ता. २१ ः ठाणे येथील प्रसिद्ध सोने-चांदी व्यापारी रत्नागिरी बाजारातून गूढरीत्या गायब झाला आहे. रत्नागिरीत व्यापारासाठी आले असताना ते सोमवारी (ता.१९) रात्रीपासून गायब झाल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झाली आहे. कीर्तिकुमार अजय राज कोठारी (वय ५५, रा. मुंबई - मीरा भाईंदर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने होते. रत्नागिरीतील एका सुवर्णकार त्या व्यापाऱ्याचा देणेकरी होता. त्याच्याजवळ असलेल्या दागिन्यांसाठी त्याचा घातपात करून संशयितांनी दागिन्यांसह त्याचा मृतदेह गायब केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अबलोली (गुहागर) पुलाजवळ एक मृतदेह सापडला आहे. पोलिस त्याची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कीर्तिकुमार यांचे वास्तव्य ज्या लॉजमध्ये होते तिथे ते सोमवारपासून परत न आल्याचे सांगितले जात आहे. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे साहित्य आहे. आता बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, रत्नागिरीतील एका सुवर्णकारानेच त्याचा सोमवारी रात्री दुकानातच खून केल्याचा संशय पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना व्यक्त केला आहे. या खुनामध्ये अन्य दोघांचा समावेश असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. त्यानंतर उशिरा एका रिक्षातून तो मृतदेह गायब केला. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या व्यापाऱ्याचे मोबाईल लोकेशन मुंबईला दाखविण्याचा प्रयत्नही संशयितांनी केल्याचे तपासात पुढे येत आहे. याबाबत पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, रत्नागिरीतील सुवर्णकारासह तिघांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
ठाणे येथून व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले सोने-चांदीचे व्यापारी किर्तीकुमार कोठारी हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत दोन ज्वेलर्सच्या दुकानात आपला सोनेचांदीचा माल विक्रीसाठी घेऊन गेले होते. त्यांचा मुक्काम आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये केला होता. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत होते; मात्र त्यानंतर त्यांचा माग लागलेला नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सोमवारी रात्रीनंतर नातेवाइकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ त्यांच्याबाबत विचारणा केली व काल थेट रत्नागिरी गाठली. त्यांचा मुलगा करण कीर्तिकुमार कोठारी (वय ३२, रा. मुंबई- मीरा भाईंदर) याने बेपत्ताची तक्रार दिली.
--------

चौकट-
लागोपाठच्या घटनांनी खळबळ
शहरातील रामनाक्यात एका व्यावसायिकाला सोमवारी (ता.२०) तिघांनी लुटले, तर काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील माळनाका येथे एका महिलेला लुटण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण असताना आता ही नवीन घटना समोर आली आहे. त्यामुळे लुटारूंची टोळी सक्रिय झाली आहे की काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98567 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..