माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट
माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट

माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट

sakal_logo
By

swt२२१४.jpg
51883
मालवणः येथील किनाऱ्यावर बंदर विभागाच्यावतीने तेलगळतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)

माशांच्या अन्नसाखळीवर संकटाचे सावट
किनाऱ्यावरील तेलगळतीः मच्छिमारांकडून ठोस उपायांची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ः देवगड ते विजयदुर्ग येथील खोल समुद्रात अपघातग्रस्त बनलेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातील तेलगळतीमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास धोका निर्माण झाला आहे. सागरी प्रदूषणामुळे माशांचे अन्न असलेल्या प्लवंगांना धोका निर्माण होऊन माशांची अन्नसाखळी बाधित होण्याची भिती जिल्ह्यातील मच्छिमारांना वाटत आहे. असे झाल्यास मासेमारीवर संकट ओढवेल असे त्यांना वाटते. शासनाने अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून हे संकट तत्काळ दूर करावे, अन्यथा आम्हाला शासनाच्या विरोधात जोरदार लढा उभारावा लागेल, असा इशारा पारंपरिक मच्छीमारांनी दिला आहे.
सात दिवसांपूर्वी विजयदुर्ग येथील समुद्रात पार्थ हे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त बनले. या जहाजावर मोठ्या प्रमाणात असलेल्या तेलामुळे तेलगळतीची समस्या निर्माण झाली आहे. या तेलगळतीचे परिणाम देवगडसह मालवण, वेंगुर्ले किनारपट्टीस मोठ्या प्रमाणात जाणवणार आहेत. प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असली तरी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तेलगळतीमुळे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची भिती वाटत आहे.
यासंदर्भात ‘सकाळ’ने मच्छिमार व संबधितांची मते जाणून घेतली. श्रमिक रापणकर मच्छीमार संघाचे सचिव दिलीप घारे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात अपघातग्रस्त पार्थ जहाजातील तेलगळती होणार आहे. या समस्येकडे शासनाने गांभीर्याने पाहून तत्काळ प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे. सागरी जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून या तेलगळतीचा परिणाम हा प्लवंगावर होणार आहे. प्लवंग, जीवाश्म जगले तरच मासेमारी व्यवसाय जगणार आहे. या प्लवंगावरच मासळीची अन्नसाखळी अवलंबून आहे. जर मोठ्या प्रमाणात ही तेलगळती वाढली तर मोठा धोका हा प्लवंगांना होणार आहे. पर्यायाने मासेमारीची अन्नसाखळी बिघडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मासेमारीची अन्नसाखळी असलेले प्लवंग वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यात वादळसदृश परिस्थितीचा मच्छीमारांना सामना करावा लागत असून अद्यापही मासेमारी पूर्वपदावर आलेली नाही. यात आता या अपघातग्रस्त जहाजातील तेलगळतीमुळे मासेमारी व्यवसायास फटका बसणार आहे. प्रशासनाकडून जे उपाय सुरू आहेत ते तात्पुरते स्वरूपाचे आहेत. खरेतर ज्यावेळी हे जहाज बुडाले त्याचवेळी हायड्रोलिक ड्रेझिंग सिस्टीमद्वारे तेलगळती होऊ नये यासाठी उपाय करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात आजही ही उपाययोजना राबविण्याची कार्यवाही केलेली नाही. शासनाने केवळ किनारपट्टी भागात प्रात्यक्षिके न दाखविता प्रत्यक्ष घटनास्थळी जात तेथील तेल काढण्याची कार्यवाही केली असती तर तेलगळती रोखण्यास मदत मिळाली असती आणि धोका टळला असता. अजूनही समुद्रातील वातावरण निवळलेले नसून पुन्हा वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या तेलगळतीचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसणार आहे.’’
श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर म्हणाले, ‘‘समुद्रात अपघातग्रस्त जहाजातून तेलगळतीची जी भीती मच्छीमारांनी व्यक्त केली होती ती खरी ठरली आहे. हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित आहे. आता सगळ्या प्रशासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संस्था यांनी यात पुढाकार घेत समुद्रातील हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांचा समन्वयच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हायड्रोलिक ड्रेझिंगद्वारे प्रशिक्षित पाणबुड्या सोडून तेल बाहेर काढणे गरजेचे आहे. या तेलगळतीचा मासेमारीसह पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. मत्स्यव्यवसाय खाते, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी, नौदलाचे तंत्रज्ञ, सीएमएफआरआय, मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या व्यक्ती, एनआयओ संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एक पथक तयार करून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नेमकी काय परिस्थिती आहे याची पाहणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भविष्यात समुद्रात अशी दुर्घटना घडू नये यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. रिफायनरी व्हावी की न व्हावी या वादात न पडता त्यासाठी जी यंत्रणा लागते तशाप्रकारची अत्याधुनिक यंत्रणा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात उभी व्हायला हवी. पार्थ या जहाजामुळे एक धडा मिळाला आहे. अशा दुर्घटना घडल्यास काय करायला हवे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालले आहे, याचा अभ्यास व्हायला हवा.’’
दरम्यान आज प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ यांच्या आदेशानुसार येथील बंदर निरीक्षक यु. आर. महाडिक, सहायक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी यांनी आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर, बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, गणेश कुडाळकर, सन्मेश परब, मंदार केणी, नरेश हुले यांच्यासह स्थानिक मच्छीमारांच्या उपस्थितीत येथील समुद्रकिनारी तेलगळतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी किनाऱ्यावर तेल आल्यास भुशाच्या वापर करून ते एकत्र करून ते नष्ट कसे करायचे याची माहिती बंदर निरीक्षक श्री. महाडिक यांनी दिली. यावेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तेलगळतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात भुसा कोठून आणायचा असा प्रश्‍न उपस्थित केला असता मेरीटाईम बोर्डाच्यावतीने भुसा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे श्री. महाडिक यांनी स्पष्ट केले.
.............
चौकट
पर्यटनालाही चिंता
पार्थ जहाजातील तेलगळती सुरू झाली असली तरी अद्याप ती जिल्ह्याच्या किनाऱ्यापर्यत पोचलेली नाही. सध्या केवळ डांबरसदृश थर किनाऱ्यावर पोचला असल्याचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. तेलगळती रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या तेलगळतीचा परिणाम मासेमारीसह, पर्यटनावर होणार असल्याने मच्छीमारांबरोबरच पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे किनारपट्टी भागात दिसून येत आहे.
----------------

swt२२१०.jpg
51886
देवगडः येथे वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्यासह अन्य उपस्थित होते.(छायाचित्रः संतोष कुळकर्णी)


तेल गळती किनाऱ्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न
प्रांताधिकाऱ्यांची माहिती ः मच्छिमारांना न घाबरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः ‘पार्थ’ जहाज दुर्घटनेतील तेल अद्याप जिल्ह्याच्या कुठल्याच किनारपट्टीपर्यंत पोचलेले नाही. समुद्रातील तेलगळतीवर तटरक्षकदलाकडून आवश्यक उपाययोजना समुद्रातच सुरू आहेत. त्यामुळे मच्छीमारांसह किनारपट्टी भागातील नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली राजमाने आज येथे केले. आपत्तीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी ठेवली पाहिजे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगड समोरील खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या ''पार्थ'' नावाच्या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या किनारपट्टी भागात सुरक्षितता म्हणून प्रशासनाने आज येथे किनारपट्टी भागातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी राजमाने यांनी समुद्रातील तेलगळतीच्या अनुषंगाने सविस्तर आढावा सादर केला. यावेळी प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, प्रभारी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भारतकुमार फार्णे, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्यासह विविध मच्छीमार संस्था प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सरपंच, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी राजमाने म्हणाल्या, ‘‘आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. जहाजाच्या तेलगळतीवर समुद्रातच उपाययोजना सुरू आहेत. तेलगळती अद्याप किनाऱ्यापर्यंत पोचलेली नाही. वाऱ्याबरोबरच तेलगोळे दक्षिणेकडेही सरकू शकतात. मात्र, असे असले तरीही किनारा स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामस्तरावर समिती गठीत करून किनारी भागाची माहिती घेणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर तेलगोळे आल्यास कोणती काळजी घेतली जावी, याचे प्रात्यक्षिक मिठमुंबरी समुद्रकिनारी तटरक्षक दलाकडून स्थानिक प्रशासनाला दाखवले आहे. समुद्रातील तेलगळती किनार्‍यापर्यंत पोचल्यास कोणती काळजी घ्यावी?, तेलगोळे कसे हाताळावेत?, त्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी? याची माहिती त्यांनी दिली. तेलगोळे पकडण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
.................
चौकट
वेंगुर्ले, मालवण प्रशासनासही मार्गदर्शन
तालुक्यातील किनारपट्टी भागाबरोबरच मालवण आणि वेंगुर्ले किनारपट्टी भागातील महसूल प्रशासनाला प्रांताधिकारी राजमाने यांनी येथूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. तेलगळतीच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला.
.......................
कोट
जहाज दुर्घटनेतील तेलगळती किनार्‍यावर पोचून किनारी भागातील जैवविविधतेच्या अनुषंगाने संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच समुद्रकिनारचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. समुद्रातील तेलगळतीच्या दृष्टीने वरिष्ठ प्रशासन उपाययोजना करीत असली तरीही किनारपट्टी स्वच्छतेकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. आपले किनारे स्वच्छ राखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
- वैशाली राजमाने, प्रांताधिकारी, कणकवली
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98677 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..