रत्नागिरी ः गंभीर गुन्ह्यांनी भयग्रस्त झाले रत्नागिरीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः गंभीर गुन्ह्यांनी भयग्रस्त झाले रत्नागिरीकर
रत्नागिरी ः गंभीर गुन्ह्यांनी भयग्रस्त झाले रत्नागिरीकर

रत्नागिरी ः गंभीर गुन्ह्यांनी भयग्रस्त झाले रत्नागिरीकर

sakal_logo
By

गंभीर गुन्ह्यांनी भयग्रस्त झाले रत्नागिरीकर

लागोपाठ दोन खून ; खाकीच्या धाकाबाबत प्रश्न

रत्नागिरी, ता. २२ ः सुसंस्कृत आणि शांत रत्नागिरी सध्या भयग्रस्त झाली आहे. क्रूर आणि एकापाठोपाठ एक असे गंभीर गुन्हे घडत आहेत. लागोपाठ दोन खून आणि लुटीचे प्रकार घडत असल्याने रत्नागिरीत अशांत आणि भयभीत झाली आहे.
मिऱ्याबंदर येथे माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांचा गळा आवळून खून झाला. त्यानंतर मृतदेह घराच्या मागे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा भयावह प्रकार उघड झाला. शहरात दिवसाढवळ्या लुटमारीचे प्रकार सुरू आहेत. मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यात काल ठाणे येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला रत्नागिरीतीलच एका सुवर्णकाराने गळा दाबून खून केला आणि मृतदेह गोणीत भरून आबलोलीत टाकल्याचा सुन्न करणारा खुनाचा प्रकार घडला आहे.
कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील गुन्हेगारीला काहीसा चाप बसला होता. बंद झालेले कारखाने बेकारी, उपासमारी आदींमुळे गुन्हेगारी फोफावण्याची शक्यता होती; परंतु सर्वांनीच परिस्थितीची जाणीव ठेवत त्यातून सरळमार्गे सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु गेल्या महिनाभरात रत्नागिरी शहर मात्र गुन्हेगारीने हादरून गेले आहे. अंमली पदार्थ आणि जुगार, हातभट्टीचे आणि सायबर गुन्हे सोडले तर इतर गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण होते; परंतु माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या निर्घुण खुनानंतर रत्नागिरीची शांतताच हरपली. पूर्ण नियोजन करून पत्नीचा गळा आवळून खून केला आणि पुरावाच नष्ट करण्याच्यादृष्टीने मृतदहे घराच्या मागे जाळून त्याची राख समुद्रात फेकून दिली. त्यानंतर संशयित पती व अन्य दोघांनी उलटसुलट माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली; परंतु पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत स्वप्नाली सावंत हिचा खून झाल्याचे उघड केले.
हे प्रकरण ताजे असताना शहरात वयोवृद्धांना लक्ष्य करत त्यांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. रामनाक्यावर महिलेला लुटले. माळनाक्यामध्ये आम्ही पोलिस आहोत, तुमचे दागिने सुरक्षित राहण्यासाठी आमच्याकडे द्या, असे सांगत महिलेची फसवणूक केली. एवढेच नाही, तर लहान मुलांना पळवणारी टोळीही सक्रिय असल्याचे बोलले जाते. उद्यमनगर भागात एका मुलाला पळवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार होता.
काही अनोळखी व्यक्ती आता थेट शाळांमध्ये जात आहेत. येथील एका नामवंत शाळेतही काही अनोळखी व्यक्ती गेल्या. मुलाला न्यायला आलो असल्याचे सांगितले; मात्र जेव्हा त्या मुलाला विचारले तेव्हा त्याने सांगितले मी यांना ओळखत नाही. शिक्षकांनी जागरूकता दाखवत त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले नाही. पालकांना बोलावून मुलाला त्यांच्या स्वाधीन केले. भयभीत करणाऱ्या या घटना कमी होत्या की काय, तोवर रत्नागिरीत भरवस्तीमध्ये ठाण्यातील एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याचा क्रुरतेने खून केल्याचा आणखी एक प्रकार घडला. यामुळे रत्नागिरीकर हादरले असून, गुन्हेगारीच्या घटनांनी भयग्रस्त झाले आहेत. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आता पोलिसांनी खाकीचा आणि कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारीला पायबंद घालण्याची गरज आहे.
-----------------
चौकट-
या गुन्ह्यातही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
स्वप्नाली सावंत यांचा खून हा पूर्वनियोजित कट होता. पुरावे नष्ट करून हा तपासच खिळखिळीत करण्याचा संशयितांचा कट होता. म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला. तीच पद्धत ठाणे येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्याचा खून केल्यानंतर वापरण्यात आली. खून करून तो मृतदेह गोणीत भरून आबलोली येथील खाडीत टाकण्यात आला. गुन्हा करून त्यातून सहज सुटण्यासाठी गुन्हेगार आता पोलिसांच्या पुढचा विचार करू लागले आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98725 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..