सिंधुदुर्गाच्‍या सागरी जैवसंपत्तीला धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गाच्‍या सागरी जैवसंपत्तीला धोका
सिंधुदुर्गाची सागरी जैवसंपत्ती काळवंडण्याची भिती

सिंधुदुर्गाच्‍या सागरी जैवसंपत्तीला धोका

ओरोस : विजयदुर्ग ते देवगड किनारपट्टीपासून ४० ते ४५ वाव समुद्रात बुडालेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू झाल्याने त्याचे मोठे परिणाम जिल्ह्यातील जैव वनस्पतींवर होणार आहेत. किल्ले सिंधुदुर्गजवळ असलेल्या प्रवाळ, तसेच जिल्ह्यातील कांदळवन, डॉल्फिन, समुद्रातील मासे, समुद्री पक्षी यांच्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. पांढरेशुभ्र असलेले किनारे काळे पडण्याची शक्यता आहे. सुदैवाने सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिकस्तरावरील ठेवा असलेल्या अलीकडेच राज्याने संरक्षित केलेल्या ‘आंग्रिया बँक’वर कोणताही परिणाम होणार नाही. आंग्रिया बँक असलेला भाग समुद्रात २६ मीटरपेक्षा जास्त खोल असल्याने ही जैवविविधता सुरक्षित राहील, असे सागरी अभ्यासकांचे मत आहे.

दुबई ते बंगळूर जाणाऱ्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजाला १६ सप्टेंबरला विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ४५ वाव अंतरावर जलसमाधी मिळाली आहे. रत्नागिरी कोस्ट गार्डच्या अहवालानुसार जहाजातून १९ सप्टेंबरपासून तेल गळती सुरू झाली आहे. परिणामी त्याचा तवंग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील समुद्रात पसरू लागला आहे. पार्थ १०१ मीटर लांबीचे जहाज आहे. त्यावरील १९ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात कोस्ट गार्डला यश आले आहे, तरीही पार्थ जहाजाच्या अपघातानंतर होणाऱ्या तेल गळतीमुळे सागरी जैवविविधतेला मात्र मोठा धोका संभवत आहे. जहाजाच्या बंकर्समध्ये १४० टन इंधन तेल, तर ३० टन डिझेल इतका साठा होता. त्याचा समुद्रात विसर्ग होऊ लागला आहे. जहाज बुडालेल्या ठिकाणापासून आठ चौरस किलोमीटर परिसरात तवंग पसरला होता; मात्र आता विजयदुर्ग ते मालवण किनारपट्टीपर्यंत तवंग पोहोचला आहे. हळूहळू वेंगुर्ले किनारपट्टीपासून गोव्याच्या किनारपट्टीवर तवंग पसरेल, अशी शक्यता गोव्यातील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी व्यक्त केली आहे. जहाजातील तेल विसर्ग २० सप्टेंबरपासून जास्त प्रमाणात होऊ लागल्याने तवंगसुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागला आहे. यामुळे जिल्ह्याची पूर्ण किनारपट्टी हादरली आहे.

आंग्रिया बँक जागतिकस्तरावरील जैवसमृद्ध ठिकाण याच भागात आहे. तेल गळतीच्या दुष्परिणामांची भीती आंग्रिया बँकेला असल्याची चर्चा होती; मात्र तवंग खोल पाण्यात दुष्परिणाम करणारा नसल्याचे सागरी अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे २६ मीटरपेक्षा खोल पाण्यात असलेल्या आंग्रिया बँकेतील जैवसृष्टीला धोका नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
किल्ले सिंधुदुर्गजवळील दुर्मीळ प्रवाळ, कांदळवन, जागतिक आकर्षण असलेले डॉल्फिन, समुद्री पक्षी, तसेच मासे यांच्यावर दुष्परिणाम होणार आहे. तेलाच्या तवंगला ही जैवसृष्टी चिकटण्याची शक्यता आहे. पूर्ण जगाचे आकर्षण असलेले जिल्ह्यातील पांढरेशुभ्र किनारे तेलाच्या तवंगाने काळवंडण्याची भीती आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील समुद्रातील जैवसृष्टीला धोका निर्माण होऊन मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पर्यटनदृष्ट्या नुकसान होऊ शकते.

तेल गळतीचा दुष्परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर होणार आहे. सुदैवाने २६ मीटरपेक्षा जास्त खोल असल्याने आंग्रिया बँकेला कोणता धोका नाही; परंतु किनारपट्टीजवळील सर्व जैवसृष्टीला धोका बसणार आहे. हे टाळण्यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे पार्थ जहाजानजीक विसर्ग झालेला तेलाचा तवंग तेथेच उचलला गेला पाहिजे. तरच तो तवंग पुढे पुढे जाणार नाही.
- डॉ. सारंग कुलकर्णी, ज्येष्ठ सागरी अभ्यासक

अपघातग्रस्त झालेल्या जहाजामुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीची पाहणी केली आहे. त्यानुसार यावर तज्ज्ञांचे पथक कार्यरत असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तेल गळतीमुळे होणारे दुष्पपरिणाम टाळता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संभाव्य उद्भवण्याऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल सज्ज आहे.
- सचिन सिंग, डेप्युटी कमाडंट, तटरक्षक दल, रत्नागिरी

देवगड समुद्रात तेलगोळ्यांचा तवंग
देवगड : ‘पार्थ’ जहाजाच्या दुर्घटनेमुळे समुद्रात झालेली तेलगळती आता खोल समुद्रात दिसून येत आहे. तेलगळतीचे काळे गोळे समुद्राच्या पाण्यावर तरंगताना मच्छीमारांना दिसत आहेत. तेलाचे काळे गोळे समुद्राच्या पाण्यात वाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहेत. यामुळे किनारपट्टीवर त्याचे थर पसरू नयेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक काळजी घेतली जात आहे. मच्छीमारांना दिसत असलेल्या तेलगोळ्यांची माहिती प्रशासन घेत आहे. खोल समुद्राच्या पाण्यात तेलगोळे पसरताना दृष्टीस पडत आहेत. काही तेल गोळे तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अद्याप तेलगोळे किनाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, तरीही या अनुषंगाने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98788 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..