आजोबा - जोशी यांच्या नातसुनेने केलेले स्मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबा - जोशी यांच्या नातसुनेने केलेले स्मरण
आजोबा - जोशी यांच्या नातसुनेने केलेले स्मरण

आजोबा - जोशी यांच्या नातसुनेने केलेले स्मरण

sakal_logo
By

rat२३p२.jpg
५२००४
केशव महादेव जोशी
-rat२३p३.jpg -
५२००५
हुतात्मा स्मारकावर जोशी यांचे नाव
------
इन्ट्रो
---
केशव महादेव जोशी हे मूळचे खानूचे. ब्रिटिश काळातील मामलेदार. चिरनेरच्या सत्याग्रहात स्वकियांवर गोळीबार करायचा नाही, असे ठामपणे सांगणारे, गोळीबाराला प्रतिबंध केला असतानाही पाटील नावाच्या इन्स्पेक्टरने सत्याग्रहींवर गोळ्या झाडल्या तेव्हा त्याला आवरण्यास गेलेल्या जोशी यांनाही त्याने गोळी घातली. हे त्यांचे स्वकियांसाठी हौतात्म्यच. त्यांचे तैलचित्र लोटिस्मा चिपळूण येथे रविवारी (ता. २५) लावण्यात येणार आहे. त्या निमित्ताने जोशी यांच्या नातसुनेने केलेले त्यांचे स्मरण.....
- संध्या साठे-जोशी, चिपळूण
---------------------------------
आजोबा

केशव महादेव जोशी माझे आजेसासरे. रत्नागिरी जिल्ह्यातील खानू गावी २९ ऑक्टोबर १८७९ ला त्यांचा जन्म झाला. ते दोन वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले; पण त्यांच्या आईने हिंमत धरून गाव सोडलं. रत्नागिरीत येऊन राहिली. खानावळ चालवली आणि मुलाचं शिक्षण केलं. मॅट्रिक झाल्यावर त्यांना रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये कारकून म्हणून नोकरी मिळाली. पुढे क्लार्कचे हेडक्लार्क आणि नंतर मामलेदार म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. अधिकाराचा अजिबात ताठा नसलेले, निगर्वी आणि अतिशय साधी राहणी असलेले व्यक्तीमत्व होते ते.
१९२९ मध्ये आजोबांची कुलाबा जिल्ह्यात पनवेल येथे बदली झाली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या संघर्षाचा तो काळ. ६ एप्रिल १९३० ला दांडी येथे मिठाचा सत्याग्रह झाला; पण पावसाळ्यामुळे तो आवरता घ्यावा लागला; पण जंगल सत्याग्रह सुरू झाला. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेर येथेच सत्याग्रह करण्याचे ठरले. ब्रिटिश सरकारच्या आदेशाने पाटील नावाचे पोलिस इन्स्पेक्टर १४ हत्यारी आणि ७ बिनहत्यारी पोलिसांसह चिरनेर येथे डेरेदाखल होते. कोणत्याही परिस्थितीत सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही, असं आदल्या दिवशी झालेल्या भेटीमध्ये इन्स्पेक्टर पाटील यांना आजोबांनी सांगितलं होतं; पण तरीही ते सत्याग्रहाच्या ठिकाणी उपस्थित राहिले. सत्याग्रह सुरू झाला. झाडं तुटू लागली. आजोबांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवून इन्स्पेक्टरनी सत्याग्रहींना मारहाण, शिवीगाळी करण्यास सुरवात केली. सापडलेल्या सत्याग्रहींना बेड्या ठोकल्या. सत्याग्रही चिडले. आजोबांनी तिथे जाऊन सत्याग्रहींना शांत केले. त्यांच्या बेड्या काढायला लावल्या. मामलेदारांचे आदेश मानावे लागले. वातावरण निवळले. पंचनामे केले गेले. त्या दिवशी आजोबांचा गुरुवारचा उपास होता. तहान लागल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी विहिरीकडे निघाले. दरम्यान, जमावापैकी कोणीतरी पोलिसांवर दगड भिरकावले. परिस्थिती पुन्हा चिघळली. इन्स्पेक्टरने स्वतःच "फायर" ऑर्डर दिली आणि पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. आजोबा तसेच मागे फिरले आणि "गोळीबार थांबवा, गोळीबार थांबवा", असं ओरडत आले; परंतु अपमानित झालेल्या, सूडभावनेने ग्रासलेल्या इन्स्पेक्टर पाटीलने आजोबांनाच गोळी घातली. पाणीसुद्धा न पिता आजोबांनी प्राण सोडले. सरकारी नोकर म्हणून ब्रिटिशांशी प्रामाणिक राहून आजोबांनी सत्याग्रह मोडून काढण्यासाठी जर फायरची ऑर्डर दिली असती तर त्या वेळी ८ ऐवजी ८०० हुतात्मे झाले असते. त्यामुळे आज इतक्या वर्षानंतरही तिथले लोक त्यांचं ऋण मानतात. तिथल्या हुतात्मा स्मारकावर त्यांचंही नाव लिहिलं गेलं आहे.
----
चौकट
२५ सप्टेंबर २०११ ची हकिगत
मी मुलाला बरोबर घेतले आणि चिरनेर गाठलं...तिथे हुतात्म्यांचे पुण्यस्मरण, त्यांच्या नातेवाइकांचे सत्कार असा मोठा शासकीय कार्यक्रम चालू होता. रायगड जिल्ह्याचे खासदार, तीन-चार आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सीईओ वगैरे नामवंत मंडळी व्यासपीठावर होती. प्रचंड गर्दी होती. आम्ही स्मारक स्तंभाला नमस्कार केला, फुलं वाहिली आणि मुलाला त्याच्या पणजोबांचं नाव दाखवत होते. योगायोगाने तिथे एक पत्रकार होता. त्याने ऐकलं, चौकशी केली आणि क्षणार्धात चक्र फिरली. अक्षरशः पाचव्या मिनिटाला मी पहिल्या रांगेतल्या निमंत्रितांसाठी असलेल्या सोफ्यावर तर मुलगा कणाद हुतात्मा केशव महादेव जोशी यांचा पणतू म्हणून व्यासपीठावर सत्कार स्वीकारत होता. खूप भारावून टाकणारा क्षण. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे हुतात्मे झाले त्यांचं कर्तृत्व मोठं आहेच; पण सरकारी नोकरीच्या बंधनात राहूनही आजोबांनी स्वतःचा जीव गमावून शेकडो लोकांचे जीव वाचवले ते कार्यही तितक्याच मोलाचं. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99004 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..