जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान
जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

sakal_logo
By

52099
सिंधुदुर्गनगरी ः ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’, अभियनाची माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे. सोबत इतर.

जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

सोमवारपासून प्रारंभ ः आरोग्य तपासणीसह विविध समस्यांबाबत करणार समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्ह्यात नवरात्रोत्सव काळात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी, विविध समस्यांबाबत समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खेड्यापाड्यातील असुशिक्षित तर शहरातील सुशिक्षित मातांकडून अनपेक्षितपणे दररोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बऱ्याच चुका होत असल्याने घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडते. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे घरातील प्रमुख जबाबदारी सांभाळणारी माता हिचे आरोग्य चांगले राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाकडून २६ पासून ५ ऑक्टोबर या नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान जिल्ह्यात राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रारंभ जिल्हास्तरावर २७ ला होणार आहे. या अभियान कालावधीमध्ये जिल्हा आरोग्य विभागाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच विविध आरोग्य विषयक समस्यांसाठी तज्ञ डॉक्टरांसह विविध तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशन केले जाणार आहे. या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व स्त्रियांची, मातांची आरोग्य विषयक तपासणी, गरोदर महिला, बालकांची आरोग्य तपासणी, रक्त चाचण्या, लसीकरण, गर्भधारणा पूर्व काळजी, जननक्षम जोडपी यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमाबाबत माहिती, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना पाळणा लांबवणे, मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. महिलांच्या गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सर तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अति जोखमीच्या माता, बालके यांना संदर्भ सेवा देऊन तज्ञामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हे अभियान रोज सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत राबवले जाणार आहे. यात विविध महाविद्यालयांमध्ये मुलींचे समुपदेशन केले जाणार असून निरोगी आयुष्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून आजारी विद्यार्थ्यांवर उपचार केले जाणार आहेत. यावेळी साथरोग नियंत्रण अधिकारी प्रशांत सौदी, क्षयरोग निर्मुलन अधिकारी हर्षल जाधव, किशोर लाड आदी उपस्थित होते.
------------
कार्यक्रमाचे स्वरूप
२६ ला सर्व आरोग्य संस्था स्तरावार कोविड लसीकरण विशेष सत्र, २७ ला मोहिमेचा शुभारंभ, २८ ते ४ ऑक्टोबर विशेष प्रजनन व बाल आरोग्य शिबीर (प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर), २८ ते ४ ऑक्टोबरला मानविकास शिबीर (वैभववाडी), २८, २९ व ३ ऑक्टोबरला डिजीटल हेल्थ मिशन (आभा कार्ड) वितरण, २९ ला असांसर्गिक आजार सर्वेक्षण निदान व उपचार शिबीर, ३० ला महाविद्यालय किशोरवयीन मुलींचे प्रबोधन व आरोग्य शिबीर, ३ ऑक्टोबरला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (प्राथमिक आरोग्य स्तरावर) आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान खाजगी USG केंद्रावर व जिल्हा रुग्णालय येथे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.
------------
कोट
या अभियान कालावधीमध्ये सुमारे नोंदीत २२०० गरोदर मातांची अधिकृत सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी करून घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ४५० हून अधिक महिलांना मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99041 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..