जिल्ह्याच्या वनविभागाला वाली कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याच्या वनविभागाला वाली कोण?
जिल्ह्याच्या वनविभागाला वाली कोण?

जिल्ह्याच्या वनविभागाला वाली कोण?

sakal_logo
By

जिल्ह्यात वनविभागाला वाली कोण?

जैवसमृद्ध प्रदेश; प्रमुख अधिकारी पदेच रिक्त, संवर्धनासाठी येताहेत मर्यादा

रुपेश हिराप : सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सह्याद्री आणि तिलारीसारखे विपुल वनक्षेत्र लाभलेल्या आणि पट्टेरी वाघाचे अस्तित्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन विभागातील उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षक ही दोन मोठी पदे चार महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. एकूणच वनोत्तर गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना या जिल्ह्याच्या वनविभागाला वाली कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील एकूणच प्रशासकीय यंत्रणा कोलमडलेली आहे. जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदे हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रिक्त पदांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवून कसाबसा कारभार चालवला जात आहे. गेले कित्येक वर्ष हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, शासनाचे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे शासनाचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असल्याची खूणगाठ इथली जनता बांधून आहे. येथील शहरात असलेल्या जिल्ह्याच्या वनविभाग कार्यालयाचे उपवनसंरक्षक आणि सहायक उपवनसंरक्षक ही महत्त्वाची पदे ३१ डिसेंबरला रिक्त झाली. उप वनसंरक्षक म्हणून शहाजी नारनवर व सहायक उपवनसंरक्षक आर. डी. जळगावकर यांनी सावंतवाडी वनविभागाचा कारभार चांगल्याप्रकारे हाकला; मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर याठिकाणी दुसरा अधिकारी आलाच नाही. मुळात उपवनसंरक्षक पदासाठी जिल्ह्यातील काहीजण इच्छुक असताना आणि त्यांच्याकडून तसे प्रयत्न होत असताना त्यांचा पत्ताही या शर्यतीत कापल्याचे समजते; मात्र चार महिने उलटले तरी सावंतवाडी वनविभागाला हक्काचा अधिकारी का मिळत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या वनविभागाचा अतिरिक्त कारभार रत्नागिरीचे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक दिपक खाडे चिपळूणमध्ये बसून हाकत आहेत. महिन्यातून कधीतरी ते या ठिकाणी फेरी मारतात; मात्र एरवी उपवनसंरक्षक केबिनचा दरवाजा चोवीस तास बंदच पाहायला मिळतो.
मुळात सिधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. सह्याद्री व तिलारीसारखे वनक्षेत्र या जिल्ह्याला लाभले आहे, नेहमी सावध भूमिका घेणाऱ्या वनविभागाने अलीकडेच जिल्ह्यात पट्टेरी वाघाचे असलेले अस्तित्वही मान्य केले. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये पट्टेरी वाघ कैद झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग वन विभागाची जबाबदारी आणखीनच वाढली होती. मुळात दोडामार्ग तालुक्यातील तिराली खोऱ्यात २९.५३ चौरस किलोमीटरमध्ये राखीव वनक्षेत्राचा समावेश तिलारी कंन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये करण्यात आला आहे. हे क्षेत्र वन्यजीव जैवविविधतेसाठी समृद्ध मानले जात आहे. याच भागातून पट्टेरी वाघाचा भ्रमण मार्ग असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे जबाबदारीच्या दृष्टीने पाहणारा अधिकारीच या ठिकाणी नसेल तर सगळेच आलबेला असल्यासारखे आहे.
याठिकाणी उपवनसंरक्षक म्हणून नारनावर यांनी काम करताना जिल्ह्याच्या वनविभागामध्ये शिस्त आणि काटेकोरपणा आणली होती. त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केल्याचे पाहिले गेले नाही; परंतु गेल्या चार महिन्यांमध्ये वन विभागाचा एकूणच कारभार लक्षात घेता पूर्वीसारखे काहीच राहीले नसल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी नसल्याने खालच्या अधिकाऱ्यांकडून मनाला वाटेल तशी कामे व कारभार केला जात आहे. याबाबत जनतेमधूनच ओरड आहे. एकूणच गेल्या चार महिन्यांमध्ये वनोत्तर गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी हक्काचा अधिकारी येणे गरजेचे बनले आहे.
------------
चौकट
दोडामार्गचा हत्ती प्रश्न गंभीर
दोडामार्ग तालुक्याचा हत्ती प्रश्न आणि त्यामुळे तेथील हैराण झालेली जनता लक्षात घेता तेथेही हक्काचा वनक्षेत्र अधिकारी नाही. जो आहे तो रजेवर असल्याने सावंतवाडी तालुक्याचे वनक्षेत्रपाल मदन शिरसागर यांच्याकडेच दोडामार्ग तालुक्याचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपेक्षा त्यांचा वावरच तेथील जनतेला भीतीदायक वाटत आहे. रात्रीच्या रात्री जनता जागून काढत आहे; मात्र हे असे चित्र असताना जिल्ह्याला हक्काचा अधिकारी असणे आवश्यक आहे.
-------------
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपवनसंरक्षक व सहाय्यक उपवनसंरक्षक पदाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. कदाचित येणाऱ्या महिन्याच्या आठवड्याभरात हे पद भरणे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग वनविभागाच्या एकूणच कामाकडे बारीक लक्ष असून सगळ्या गोष्टी आपल्या कानावर आहेत.
- मनिकानंद रामानुजूम, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर
------------
रिक्त पदे अशी
पद*संख्या
उपवनसंरक्षक*१
सहायक उपवनसंरक्षक*१
वनपाल*२
वनरक्षक*४९
लिपिक*४
सर्वेअर*१
शिपाई*१
अनुरेखक*१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99054 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..