शिवसेनेचा आता ‘करेक्ट कार्यक्रम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena
शिवसेनेचा आता ऑन दी स्पॉट करेक्ट कार्यक्रम

शिवसेनेचा आता ‘करेक्ट कार्यक्रम’

चिपळूण : चिपळुणात काही पदाधिकारी शिवसेना सोडून गेलेल्याचे दुःख आहेच; मात्र दुसरीकडे पदाधिकारी निवडीत नव्या विचाराला वाव मिळाला आहे. शिवसेना पुन्हा उभी राहण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जातील. विविध विषय हाती घेऊन ऑन दी स्पॉट करेक्ट कार्यक्रम केला जाईल, अशी भूमिका उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. येथील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी विनोद झगडे, उपजिल्हाप्रमुखपदी प्रताप शिंदे तर समन्वयकपदी सुधीर शिंदे यांची निवड झाली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना विनोद झगडे व प्रताप शिंदे म्हणाले, आम्ही जुने शिवसैनिक असलो तरी आता नवीन भूमिका निभावावी लागणार आहे.

तालुकाप्रमुख झगडे हे चांगले नेतृत्व आहे. त्यांच्याकडे चांगले संघटनकौशल्य आहे. गेली २० वर्षे ते राजकारणात सक्रिय असून त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्षाला चांगली उभारी मिळेल. माजी आमदार सदानंद चव्हाण व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेल्याचे दुःख आहेच; पण आता नव्या विचाराला आणि नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत पुन्हा जोमाने काम करून पक्षाला उभारी मिळण्यासाठी काम करू. नव्या विचाराला आणि नेतृत्वाला संधी मिळाल्याने यापुढे मुळमुळीत धोरण न ठेवता ऑन दी स्पॉट करेक्ट कार्यक्रम करण्यावर भर देऊ. सेनेतील कार्यकर्ते जीव ओतून काम करणारे आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात पक्षाला पुन्हा उभारी मिळालेली दिसेल.

तालुकाप्रमुख झगडे म्हणाले, गेल्या २२ वर्षात सरपंच ते जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती पदासह विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी पक्षासोबत राहिले आहेत. शिवसेनेत आम्ही माजी आमदार सदानंद चव्हाण यांचेच नेतृत्व मानले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका व्हायच्या. पक्षात राहण्यासाठी त्यांना वारंवार आग्रह केला होता. त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल, असेही प्रताप शिंदे यांनी सांगितले. पंचायत समितीचे गटनेते राकेश शिंदे, ग्राहक संरक्षणचे जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, एम. डी. शिंदे उपस्थित होते.

भास्कर जाधवांनी दिले स्वातंत्र्य
आमदार भास्कर जाधव यांची नेतेपद निवड झाली. त्यांचीही आम्हाला चांगली साथ मिळत आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आहे. तुमच्यात माझी लुडबूड राहणार नाही. तालुक्यावर मात्र माझे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99121 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..