रत्नागिरी : मरीन पार्क आराखडा आठ दिवसात; उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : मरीन पार्क आराखडा आठ दिवसात; उदय सामंत
मरिन पार्क उभारण्यासाठी आठ दिवसात आराखडा

रत्नागिरी : मरीन पार्क आराखडा आठ दिवसात; उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत मरिन पार्क उभारण्यासाठी आठ दिवसात आराखडा तयार केला आहे. ३५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून जिल्ह्यातील १२ ते १५ हजार लोकांना यातून रोजगार मिळेल. मँगो पार्कमधूनही तेवढाच रोजगार मिळू शकतो तर जेएसडब्ल्यू कंपनीही ५ हजार कोटीची गुंतवणुक करून वीजनिर्मिती प्रकल्प उभारत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. दोन दिवसीय निर्यात परिषद व प्रदर्शन उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील अरिहंत मॉलमधील टिळक सभागृहातील परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उद्योग सहसंचालक एस. आर. लोंढे, सहसंचालक कोकण विभाग सतीश भामरे, सिडबीचे उपमहाव्यवस्थापक रहाटे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, रत्नागिरीतील उद्योजक स्वतःच्या पायावर उभे राहिला पाहिजे, त्याला राजाश्रय मिळावा हा उद्देश आहे. या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योजक, निर्यातदार तयार होतील. स्टर्लाईट उद्योगसमूहासाठी ५०० एकर जागा एमआयडीसीने १९९२ मध्ये दिली. त्यावर उद्योग उभारण्यात आलेला नाही. याबाबत शासनाने न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी अद्यापही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले नाहीत. १२ ऑक्टोबरला ही प्रक्रिया सुरू होत आहे. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी इतर उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकातील हजारोंना रोजगार मिळेल याबाबत पावलं उचलली जात आहेत. कोरोना काळात देशातील ४ ठिकाणी ड्रगपार्क (औषध कारखाने) उभारण्याचा निर्णय झाला. याला या आधीच्या सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका बसला व रायगड जिल्ह्यात एक इंचही जागा उपलब्ध करून दिली गेली नाही. कुणावरही अवलंबून न राहता हा ड्रगपार्क महाराष्ट्रात होईल, याचीही खबरदारी आम्ही घेत आहोत.

राज्यात औषध पार्कसाठी (ड्रग्ज पार्क) २० ऑक्टोबर २०२० ला प्रस्ताव आला होता. मागील दोन वर्षात रोहा, मुरुड येथील एक इंच जमीनही त्यासाठी दिली गेली नाही. उद्योगमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रकल्प यावेत यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र शासनावर अवलंबून न राहता महाराष्ट्र शासन औषध पार्क उभे करणार आहे. त्यासाठी ५० हजार कोटीची गुंतवणूक करण्यात येईल.

जेएसडब्ल्यूचा वीजनिर्मिती प्रकल्प
जेएसडब्ल्यू कंपनीबरोबर बैठक घेतली. ५ हजार कोटीची गुंतवणूक असलेला वीजनिर्मिती प्रकल्प ते उभारणार आहेत. त्यामधून ५५० लोकांना कायमस्वरूपी तर १२०० लोकांना कंत्राटी तत्त्वावर रोजगार मिळणार आहे.