कणकवलीत चोरट्यांनी फोडले दहा फ्लॅट; पळून जाताना रहिवाशांवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theft crime news
कणकवलीत चोरट्यांनी फोडले दहा फ्लॅट

कणकवलीत चोरट्यांनी फोडले दहा फ्लॅट; पळून जाताना रहिवाशांवर हल्ला

कणकवली : शहरातील मराठा मंडळ रोडवर असलेल्या क्रिस्टल रेसिडेन्सी बिल्डिंगमधील तब्बल दहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले. पळून जाताना रहिवाशांवरही चोरट्यांनी हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न केला. मध्यरात्री दोन ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली; मात्र चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. फोडलेल्‍या दहा फ्लॅटपैकी रेणुका किरण कात्रुट यांच्या घरातील ३२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्‍याची फिर्याद कात्रुट यांनी आज पोलिस ठाण्यात दिली. उर्वरित नऊ फ्लॅटमधील रहिवासी बाहेरगावी असल्‍याने एकूण चोरीस गेलेला मुद्देमाल समजलेला नाही. आठ ते दहा जणांचे सराईत टोळके असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

शहरातील मराठा मंडळ रोडवर क्रिस्टल रेसिडेन्सी कॉम्प्लेक्‍समध्ये दोन विंग आहेत. एका विंगमधील आठ बंद फ्लॅट फोडून आतील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुसऱ्या विंगमधील दोन बंद फ्लॅट फोडले आणि तिसरा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्‍न सुरू होता. या दरम्‍यान या विंगमधील आरोही आचरेकर यांना पहाटे तीनच्या सुमारास इमारतीमधून काही तरी तोडफोड होत असल्‍याचा आवाज ऐकू आला. त्‍यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्‍न केला असता बाहेरून कडी असल्‍याचे लक्षात आले. त्‍यामुळे त्यांनी आपले भाऊ राजा आंब्रे यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. तेलीआळी येथे राहणारे आंब्रे पाच मिनिटांत क्रिस्टल रेसिडेन्सीमध्ये दाखल झाले. त्‍यांनी आचरेकर यांच्या फ्लॅटला बाहेरून लावलेली कडी काढली. त्‍यानंतर आचरेकर आणि आंब्रे यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. यावेळी त्‍यांना या इमारतीमध्ये दोघा-तिघा चोरट्यांचा वावर दिसून आला. त्‍यांना पकडण्यासाठी आंब्रे आणि त्‍यांचे भाऊजी आचरेकर इमारतीच्या दोन्ही दरवाजावर थांबून होते.

यावेळी एका चोरट्याने इमारतीवरून आंब्रे यांच्या दिशेने सिमेंटचा ब्लॉक फेकला. त्‍यानंतर बाहेर पडताना कटावणीने हल्‍ला करण्याचा प्रयत्‍न केला. यात आंब्रे आणि आचरेकर काहीसे बाजूला झाले. त्याचा फायदा घेत तिन्ही चोरटे इमारतीमधून पसार झाले. चोरट्यांनी सर्व दहा फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बंद कपाटे फोडून आतील मुद्देमाल लंपास केला. चोरटे पळून जाताना सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहायक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक बापू खरात, राजकुमार मुंढे, वृषाली बर्गे, हवालदार किरण मेथे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्‍ज्ञांकडून चोरट्यांच्या बोटांचे ठसेही मिळाले आहेत. श्‍वान पथकाकडूनही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्‍न केला. पहाटे साडेतीन ‍यापासून कणकवली शहर तसेच महामार्ग, रेल्‍वे स्थानक आदी ठिकाणी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला.

महामार्ग आणि अन्य रस्त्यांवर नाकाबंदीही केली होती; मात्र चोरट्यांचा सुगावा लागू शकला नाही.क्रिस्टल रेसिडेन्सीमधील माधवबाग, सुधाकर साळवी यांचे दोन फ्लॅट, न्युट्रीशियन सेंटर, माधव विश्‍वनाथ चव्हाण, सिद्धेश महाकाळ, रंजना वालावलकर, आकांक्षा केळकर आणि रूपाली कुणकवळी यांचे बंद फ्लॅट फोडण्यात आले. ही सर्व मंडळी कणकवलीत आल्‍यानंतर चोरीस गेलेला मुद्देमाल समजून येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दोन दुचाकीही पळविण्याचा प्रयत्‍न
क्रिस्टल रेसिडेन्सीमधील प्रसाद जाधव आणि अन्य एका रहिवाशाची दुचाकीही चोरण्याचा प्रयत्‍न चोरट्यांनी केला. दोन्ही दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून त्‍यावरून चोरटे पळून जाणार होते; मात्र पहाटे साडेतीनच्या सुमारास आंब्रे आणि आचरेकर हे इमारतीबाहेर थांबून राहिल्‍याने चोरट्यांचा दुचाकी चोरीचा प्रयत्‍न फसला.