शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर
शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर

शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर

sakal_logo
By

KOP22L52554

शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर
---
श्री अंबाबाई मंदिरातील सर्व तयारी पूर्ण; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या (ता. २६)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शहरासह जिल्ह्यात रास- दांडियाही रंगणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील सर्व तयारी पूर्ण झाली. उद्या सकाळी मंदिरात घटस्थापना होईल. दरम्यान, यंदाही नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या सालंकृत पूजा बांधल्या जातील.
साडेतीन शक्तिपीठांतील आद्य पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. उत्सव काळात देशभरातून २५ लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून, देवीला पहाटेचा व सकाळचा अभिषेक झाल्यावर सकाळी साडेआठला तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. दुपारच्या आरतीनंतर देवीची सिंहासनारूढ रूपातील पूजा बांधली जाईल. पालखीचे पूजन रात्री साडेनऊला होऊन पालखी सोहळा सुरू होईल. दरम्यान, भाविकांमुळे मंदिर परिसरातील यात्री निवास, खासगी लॉज हाउसफुल्ल झाले आहेत.
---
आजचे सांस्कृतिक कार्यक्रम
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (ता. २६) सकाळी आठ ते अकरा या वेळेत संभाजीनगर येथील योगीराज भजनी मंडळ, इचलकरंजी येथील श्री सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, अकरा ते दुपारी दोन या वेळेत ब्रह्मसखी महिला भजनी मंडळ, अंध युवक मंच, दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत दौलतनगर येथील आदिशक्ती महिला भजनी मंडळ, स्वामी ओम महिला भजनी मंडळ, सायंकाळी पाच ते सात या वेळेत वाघेश्वरी महिला भजनी मंडळ व गजानन दत्त माऊली महिला सोंगी भजनी मंडळ आणि सात ते रात्री नऊ या वेळेत मधुबन मैफल असे सांस्कृतिक कार्यक्रम व भजन सादर होणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा मंदिरात दाखल
देवस्थान समितीकडे रत्नाकर बँकेकडून तीन व भारतीय स्टेट बँकेकडून दोन अशा एकूण पाच अत्याधुनिक डीएफएमडी सुपूर्द करण्यात आले. या मशिनद्वारे १८ झोनमध्ये तपासणी होते. त्याशिवाय, येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे फेस कॅप्चरिंग व टेंपरेचर मॉनिटरिंग होणार आहे. रत्नाकर बँकेचे व्यवस्थापक सागर कुलकर्णी व भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक विवेककुमार सिन्हा, महेश वाघमारे यांनी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे यंत्रणा सुपूर्द केल्या. याचे मुख्य नियंत्रण देवस्थान समितीचे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षप्रमुख राहुल जगताप व सहायक नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडे आहे. या वेळी व्यवस्थापक महादेव दिंडे, प्रशांत गवळी उपस्थित होते.

अंबाबाईच्या विविध रूपांतील पूजा अशा ः
सोमवारी (ता. २६) प्रतिपदा ः सिंहासनारूढ पूजा
मंगळवारी (ता. २७) द्वितीया ः श्री दुर्गादेवी रूपातील
बुधवारी (ता. २८) तृतीया ः श्री सिद्धिदात्री देवी रूपातील
गुरुवारी (ता. २९) चतुर्थी ः श्री मीनाक्षीदेवी (मदुराई) रूपातील
शुक्रवारी (ता. ३०) पंचमी ः गजारूढ पूजा
शनिवारी (ता. १) षष्ठी ः श्री भक्तिमुक्ती प्रदायिनी देवी रूपातील
रविवारी (ता. २) सप्तमी ः श्री शाकंबरी देवी (बदामी) रूपातील
सोमवारी (ता. ३) अष्टमी ः श्री महिषासुरमर्दिनी देवी रूपातील
मंगळवारी (ता. ४) नवमी ः श्री विश्वेश्वरी जगदात्री देवी रूपातील
बुधवारी (ता. ५) दसरा ः रथारूढ पूजा