सावंतवाडी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत
सावंतवाडी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत

सावंतवाडी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत

sakal_logo
By

52489
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुंडलिक दळवी. शेजारी देवा टेमकर, सायली दुभाषी आदी.


सावंतवाडी रुग्णालय समस्येंच्या गर्तेत

पुंडलीक दळवी ः पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः येथील उपजिल्हा रुग्णालय वारंवार विविध समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार अपयशीच आहेत. त्यामुळे आता नवनिर्वाचित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तरी जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांकडे गाभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना जिल्हा सोडून अन्य जिल्ह्याची जबाबदारी कशी दिली? याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. केसरकर यांना मुंबईचे पालकमंत्रीपद देण्यामागे नेमका सूत्रधार कोण? याचा केसरकरांनीच शोध घ्यावा, असाही टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दळवी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलत होते. त्यांच्यासोबत शहराध्यक्ष देवा टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, हिदायतुल्ला खान, सायली दुभाषी, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते. श्री. दळवी पुढे म्हणाले, ‘‘शहरासह रुग्णालयातील अनेक प्रश्न आहेत. हृदयरोग तज्ज्ञ नसल्यामुळे गोवा मेडिकल कॉलेज शिवाय (गोमेकॉ) रूग्णांकडे पर्याय उरलेला नाही. शवागृहही बंद आहे. त्यामुळे किमान मृतदेहांची हेळसांड थांबवायला ते तरी दुरुस्त करा. येणाऱ्या काळात आम्ही पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करून आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याची मागणी करणार आहोत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘येथील मोती तलावाच्या फुटपाथची अद्याप दुरुस्ती झाली नाही. त्याचा त्रास तलावाकाठी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना पादचाऱ्यांना सहन करावा लागतो. तर फुटपाथ खचलेल्या परिसरातून जाताना रस्त्यावरून चालावे लागते. एखाद्या भरधाव वाहनाची धडक बसून अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. मात्र, याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाहीत, अशी नाराजी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे सुद्धा तात्काळ लक्ष द्यावे.’’ ते म्हणाले, ‘‘येथील उपजिल्हा रुग्णालय वारंवार विविध समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार अपयशीच आहेत. त्यामुळे रुग्णांचं नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गोवा किंवा खाजगी रुग्णालयाचा सल्ला दिला जातो. मात्र, नातेवाईकांची परिस्थिती नसल्यास त्यांच्याकडून स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयात रुग्ण ठेवत असल्याचे पत्र लिहून घेऊन, उपचार दिले जात आहेत. अशी नाराजीही अनेकांनी व्यक्त केली. याकडे आता निदान पालकमंत्र्यांनी तरी आरोग्य यंत्रणेचा प्रश्न सोडवावा. उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह गेले अनेक महिने बंद आहे. रुग्णांवर उपचार नको, निदान त्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ते तरी दुरुस्त करावे.’’
---------
चौकट
आतातरी प्रयत्न करावेत
केसरकर यांनी मागच्या काही दिवसांत शहरातील गल्लोगल्लीत दौरा केला. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निदर्शनास आल्याच असतील. त्या सोडविण्यासाठी त्यांनी आता तरी प्रयत्न करावे, असे श्री. दळवी म्हणाले.