गुहागर-पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा
गुहागर-पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा

गुहागर-पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा

sakal_logo
By

पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा

वेळणेश्र्वर ग्रामस्थ ; प्रशासनाला निवेदन
गुहागर, ता. २५ : वेळणेश्र्वर महसुली गाव मोठा आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये वाडदई गाव येतो. शिवाय ब दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून वेळणेश्र्वरला ओळखले जाते. त्यामुळे कामाच्या निपटाऱ्यासह विकासाला गती मिळण्यासाठी वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास घाणेकर, माजी सरपंच संदीप ठाकूर यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीमध्ये सौ. जाधव या पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्त होत्या. मात्र एक वर्षांपूर्वी त्यांची प्रशासकीय बदली तालुक्यातील पालपेणे ग्रामपंचायतीमध्ये झाली. ही बदली झाल्यावर प्रशासनाने सौ. जाधव यांच्याकडे वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीचा प्रभार दिला. त्यामुळे आता सौ. जाधव बुधवार व शुक्रवार अशा दोन दिवस वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीमध्ये असतात.
वेळणेश्र्वर महसुली गावाची लोकसंख्या शासकीय नोंदीप्रमाणे ३ हजार ७०० आहे. गेल्या १० वर्षात इथला पर्यटन व्यवसाय वाढला आहे. वेळणेश्र्वर हे ब दर्जाचे पर्यटन स्थळ असून येथे पावसाळ्यानंतर पर्यटकांची वर्दळ सुरू होते. शिवाय एक अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे आज गावाची लोकसंख्या ५ हजारपेक्षा जास्त आहे.
जिल्हा परिषदेच्या ३ शाळा, १ हायस्कूल, १ अभियांत्रिकी महाविद्यालय यामधील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना लागणारे दाखले देण्याचे काम ग्रामविकास अधिकाऱ्यांना करावे लागते. विविध विकास कामांचे प्रस्ताव करणे, निविदा काढणे, शासनाकडे कामांचा पाठपुरावा करणे, केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, शेतकरी बागायदार यांच्या योजना ही सर्व कामे एक ग्रामविकास अधिकारी केवळ दोन दिवसात करू शकत नाही. ग्रामपंचायतीचा दाखला मिळविण्यासाठी ग्रामस्थांना फेऱ्या माराव्या लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास घाणेकर, माजी सरपंच संदीप ठाकूर, गावाच्या समन्वय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी राऊत यांना देण्यात आले आहे. निवेदनावर दिलीप गोखले, नितीन पोळेकर, सचिन पोळेकर, रवींद्र पोळेकर, शिवराम गुरव आदींच्या सह्या आहेत.