रिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

refinery project
राजापूर- रिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक

रिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकर

राजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व देशातील शास्त्रज्ञ तसेच नवनव्या तंत्रज्ञानाला जे आव्हान देत आहेत त्यांचा कायदेशीर बंदोबस्त केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी व्यक्त केली.
सोयीस्कर राजकारण करणारे राजकीय पक्ष गुजरातमध्ये चांगले प्रकल्प आणि महाराष्ट्रात प्रदूषणकारी प्रकल्प असाही एक युक्तीवाद करीत आहेत. मात्र मुळात गुजरातमध्ये चार रिफायनरीप्रकल्प पूर्वीच कार्यान्वित असून देशातील ४१ टक्के क्रुड ऑईल प्रोसेसिंग एकट्या गुजरातमध्ये होत आहे. बारौनी, जामनगर, वडिनार आणि गुजरात रिफायनरीमुळे गुजरातचा कायापालट होण्यास मदत झाली आहे आणि गुजरातच्या एकंदरित विकासात रिफायनरीचा वाटा मोठा आहे हे सिद्ध झाले आहे.

धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा विषय राज्यात सत्तांतर होताच वेगाने पुढे आला ते पाहता राज्यातील शिंदे सरकारबद्दल स्वाभाविकच हजारो प्रकल्प समर्थकांत सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यात उद्योगमंत्री व पालकमंत्रीपदी सामंत यांची झालेली नियुक्ती झाल्याने प्रक्रियेला वेग येणार असल्याचे शिवलकर यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे ज्या समित्या स्वयंप्रेरणेने केवळ राजापूर तालुक्याचा विकास या मुद्यावर एकत्र येत रिफायनरीच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत त्या समित्यांशी एमआयडीसीने अद्यापपर्यंत साधा संपर्क साधलेला नाही. उद्योगमंत्री सामंत यांनी स्थानिकांचे गैरसमज दूर करणार, त्यांचे प्रबोधन करणार अशा भूमिका जाहिर केल्या आहेत. मात्र एमआयडीसी अधिकाऱ्यांची त्रयस्थ वागणूक पाहता हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

भूमीपुत्रांच्या हितासाठी समिती बांधील
रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती ही केवळ राजापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने गठित झालेली आहे. त्यामुळे बारसू धोपेश्वरमधील स्थानिक शेतकरी जे, पारंपरिक पद्धतीने तेथील मुळ भूमिपुत्र आहेत. त्यांच्या हितासाठी समिती बांधील आहे. गुंतवणूकदार अथवा एमआयडीसी किंवा रिफायनरी प्रकल्प येणार म्हणून ज्यांनी जमिनीची खरेदी केलेली आहे. त्यांच्याबाबतीत समितीला कोणतेही देणेघेणे नसल्याचे शिवलकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :KokanRefinery