‘ना घर का, ना घाट का’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ना घर का, ना घाट का’
‘ना घर का, ना घाट का’

‘ना घर का, ना घाट का’

sakal_logo
By

52533
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. बाजूला यशवंत परब, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे आदी. (छायाचित्र ः निखिल माळकर)

‘ना घर का, ना घाट का’

राऊळांची केसरकरांवर टीका; पालकमंत्री पदांच्या घोषणेनंतर निशाणा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः शिवसेनेशी गद्दारी करत शिंदे-फडणवीस सरकारची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तळी उचलली आहे; मात्र, त्यांना आता मिळालेले मंत्रिपद पसंत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता ते नाराज असले तरी ५० खोके घेतल्यामुळे बोलू शकत नाही. त्यामुळे केसरकर यांची परिस्थिती ‘ना घर का, ना घाट का’, अशी झाली आहे. केसरकरांना शोभेल असे मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे त्यांनी नाममात्र अशी कामे करावीत, अशी टीका येथील शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील काल (ता.२४) पालकमंत्री पदे जाहीर झाल्यानंतर श्री. राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांच्यावर टिका केली. त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, अजित सांगेलकर, आबा सावंत, सुनील गावडे, विनोद ठाकूर, राजाराम गावडे, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पालकमंत्री पदे जाहीर केली. शिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते केसरकर यांना मुंबईचे पालकमंत्री पद देऊन भाजपाने जोर का झटका दिलेला आहे. केसरकर राष्ट्रीय प्रवक्ते झाल्यानंतर हवेत गेले होते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत सुटले होते. त्यांची आता बोलती बंद झाली आहे. केसरकरांनी २०१४ नंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मंत्रीपद, गृह, वित्त खाते अशा चांगल्या खात्यात काम करण्याची संधी दिली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देत त्यांचा मानसन्मान केला. चांदा ते बांदा योजनेवर त्यांनी काम केले. मात्र, त्यांना एवढे देऊन सुद्धा गद्दारी करत शिंदे गटात सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकारची तळी हातात उचलली त्यांना पसंत नसलेला मंत्री खाते दिले. पालकमंत्री पदासाठी इच्छुक असून सुद्धा ते पद दिले नाही. मात्र, आता जरी केसरकर नाराज असले तरी ते बोलू शकत नाहीत. कारण ५० खोके त्यांना मिळाले आहेत. ज्या पद्धतीने केसरकारांनी कबुलायतदार गावकऱ्यांचा प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रोजगार तसेच मतदारसंघातील अनेक प्रश्नांना न्याय देऊ शकले नाही तरी ते बोलू शकत नाहीत. कारण केसरकर यांची परिस्थिती ''ना घर का, ना घाट का'' अशी झाली आहे."
श्री. राऊळ पुढे म्हणाले, "केसरकारांना शिवसेनेत योग्य मानसन्मान मिळत होता. मात्र, मानाचे पद मिळत नसल्यामुळे नाराज आहे, असे सांगून ते शिंदे गटात गेले. त्यांना आता तेथे तरी किती मान मिळाला, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. केसरकर ज्यांच्यावर विश्वास टाकून शिंदे गटात सामील झाले होते, त्यांनीच आता त्यांना मतदारसंघातून पूर्णपणे मोकळे करून आपल्या पक्षाला रान मोकळे करून घेतले आहे. ही एक भाजपाची खेळी आहे. हे केसरकरांना आता तरी दिसेल का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला संपवत आहेत असे केसरकर म्हटत होते. आज त्यांना कळले का कोण कोणाला संपवत आहे? उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य होता. ठाकरेंसारखे सक्षम नेतृत्व या शिवसेनेला मिळालेले आहे. ज्यांनी शिवसेना सोडली ते संपले आहेत, हा इतिहास आहे. हीच वेळ आता केसरकरांवर येणार आहे. जे केसरकर आमदार म्हणून या मतदारसंघात दुर्मिळ होते ते अजून अतिदुर्मिळ होणार आहेत."
उपजिल्हाप्रमुख कासार यांनी, सन्मान मिळत नसल्यामुळे शिवसेना सोडणारे केसरकर शिंदे गटातील मंत्री पदाचा राजीनामा देतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्थानिक आमदार असतानाही पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जात नाही, हे सुद्धा केसरकरांचे एक मोठे अपयश आहे. त्यांच्या मतदारसंघात कब्जा मिळवण्यासाठी भाजपाची ही खेळी आहे, हे आता तरी त्यांनी ओळखावे, असा टोलाही कासार यांनी लगावला. वेंगुर्ले तालुकाप्रमुख परब म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केसरकर मंत्री असताना सुद्धा जिल्हा सांभाळू शकत नाही ते जिल्ह्यावर काम करू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत ते कुठच्या पद्धतीने यंत्रणेमध्ये वावरून घेतात याचे आत्मपरीक्षण अजूनही केसरकारांनी करावे.’’
-----------------
चौकट
शिक्षण खात्यात तरी चांगले काम करा
राऊळ पुढे म्हणाले, ‘‘केसरकरांनी येणाऱ्या काळात शिक्षण खात्यात चांगले काम करावे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शनची गरज आहे. ती सुद्धा त्यांनी पूर्ण करावी. ज्या शाळा नादुरुस्त आहेत, त्यांना निधी आणावा. अशा प्रकारे नाममात्र काम केसरकरांना राहिले आहे ते त्यांनी करावे.’’