मच्छीमारांच्या जाळ्यात काळा तवंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमारांच्या जाळ्यात काळा तवंग
मच्छीमारांच्या जाळ्यात काळा तवंग

मच्छीमारांच्या जाळ्यात काळा तवंग

sakal_logo
By

52564
वायरी ः दांडी येथील मोरेश्वर किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जाळ्यात आढळलेला डांबरसदृश पदार्थ.

मच्छीमारांच्या जाळ्यात काळा तवंग

वायरीतील प्रकार; ‘पार्थ’च्या दुर्घटनेमुळे किनाऱ्यावर चिंतेचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : समुद्रात बुडालेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातून सुरू झालेल्या तेलगळतीमुळे समुद्री प्रदूषणाचे संकट ओढवले आहे. या जहाज दुर्घटनेनंतर समुद्रात काळ्या रंगाचे डांबरसदृश पदार्थ दिसून येत असल्याचा घटना समोर येत आहेत आज मालवणात सलग दुसऱ्या दिवशी मच्छीमारांच्या जाळ्यात अशाप्रकारचा डांबरसदृश पदार्थ आढळून आला आहे. वायरी दांडी येथील मोरेश्वर किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जाळ्यात हा काळ्या रंगाचा डांबरसदृश पदार्थ आढळला. समुद्रात १४ वाव अंतरावरील पाण्यात अशा पदार्थाचे तवंग दिसून येत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली आहे. त्यामुळे हा पदार्थ पार्थ जहाजातील तेल तंवग आहे का? याबाबत किनारपट्टीवर चर्चा होत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या समुद्रात १६ सप्टेंबरला पार्थ नावाचे तेलवाहू जहाज बुडाले होते. या जहाजातून तेल गळती सुरू झाल्याने समुद्रात तेल प्रदूषणाचे संकट ओढवले आहे. तसेच हे तेल किनाऱ्यावरही येण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा प्रशासन व कोस्टगार्ड रत्नागिरी यांच्याकडून तेल किनाऱ्यावर आल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत रंगीत तालीम राबविण्यात आली. या पार्श्वभूमीवर जहाज बुडाल्यानंतर एका आठवड्यानंतर काल मालवणसमोर पाच सागरी मैल अंतरावर म्हणजेच समुद्राच्या १२ वाव पाण्यात काळ्या तवंगासारखा पदार्थ मच्छीमारांना दिसून आला होता. प्लास्टिक पिशव्या जाळल्यानंतर जसा चिकट पदार्थ तयार होतो, तसा हा काळा तवंग काही मच्छीमारांच्या जाळ्यातही अडकला होता. आज दुसऱ्या दिवशीही समुद्रात मासेमारीस गेलेल्या मोरेश्वर किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जाळ्यातही तसाच काळ्या रंगाचा व डांबरसदृश पदार्थ अडकल्याचे दिसून आले. समुद्रात १४ वाव अंतरावर अशा पदार्थाचा तवंग दिसत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. हा पदार्थ मोठ्या प्रमाणात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे जाळी देखील खराब होत आहेत.
-------
चौकट
दखल घेण्याची मागणी
तेल गळतीमुळे समुद्रात पसरणारे तेल तवंग किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागले आहेत का? याबाबत मच्छीमारांमध्ये चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे तेलगळतीनंतर तेलाचे तवंग जिल्ह्यातील किनाऱ्यांकडे सरकत आहेत. याला कुठेतरी पुष्टी मिळत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.