
गुहागर-घोटाळा प्रकरणी कारवाई
शाळेच्या शौचालय दुरुस्तीत
घोटाळा प्रकरणी कारवाई
प्रशासनाचे लेखी आश्वासन ; आश्वासनानंतर उपोषण मागे
गुहागर, ता. २ ः पालशेत काळे वठार शाळेच्या शौचालय दुरुस्तीच्या कामात घोटाळा झाल्याचे आरोप करीत गुहागर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पालशेत ग्रामपंचायत सदस्य मीनार पाटील आदीनी दिला होता. त्याप्रमाणे उपोषण सुरू केले होते. याप्रकरणी कारवाईचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पालशेत ग्रामपंचायतीतून काळे वठार शाळेच्या शौचालय दुरुस्तीसाठी एक लाख ५२ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काम पूर्ण होण्या अगोदरच या शौचालयावर काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले होते. सदर बाब निदर्शनात येतात रात्रीच्या वेळी मोबाईलच्या बॅटरीवर काम करण्यात आले. अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम करण्यात आले असून सदर कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य मीनार पाटील यांनी केला होता.
गटविकास अधिकाऱ्यांकडे कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मीनार यांनी केली होती.
गटविकास अधिकारी यांनी याबाबत विलंब लावला. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करताना तक्रारदार यांना घटनास्थळी न बोलता परस्पर पाहणी करून सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान यावर जिल्हा स्तरावरून चौकशी होऊन या घोटाळ्यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. पालशेत ग्रामपंचायत सदस्य मीनार पाटील उपसरपंच महेश वेल्हाळ यांच्यासहित ग्रामस्थांचे टाळ मृदुंगाच्या गजरात गाण्यांच्या चालीवर आंदोलन सुरू होते. भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, तसेच शिंदे शिवसेना गट तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाकडून वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.