
पोखरण शाळेस सर्वतोपरी सहकार्य
swt३११.jpg
७२८९६
सिंधुदुर्गनगरीः शतक महोत्सवाचा प्रारंभ करताना आमदार वैभव नाईक. सोबत गटशिक्षणाधिकारी संतोष किंजवडेकर व अन्य.
पोखरण शाळेस सर्वतोपरी सहकार्य
आमदार वैभव नाईकः शतक महोत्सवी कार्यक्रमांचे थाटात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः स्वातंत्र्यपूर्व काळात शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्त्व जाणून १९२४ साली पोखरण शाळेची स्थापना झाली. ही गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी एकत्र येत उभारलेली हीच शाळा आज दिमाखात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन आज मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे असून शाळेत सर्व सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शतक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ काल (ता. २) सायंकाळी आमदार नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शाळेच्या वतीने आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, पोखरण-कुसबे सरपंच समीक्षा जाधव, रोटरी क्लब प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, केंद्रप्रमुख संजय कदम, मुख्याध्यापिका प्रतीक्षा कदम, विश्वनाथ सावंत, अरुण सावंत, सविता सावंत, पंढरीनाथ सावंत, विठोबा सावंत, रवींद्र पांगम, संतोष सावंत, दिया मठकर, सुभाष सावंत, एस. वाय. सावंत, दीपक सावंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत यांनी केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ च्या शतक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.