वेंगुर्लेचा इतिहास सांगणार ‘बोलक्या भिंती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेचा इतिहास सांगणार ‘बोलक्या भिंती’
वेंगुर्लेचा इतिहास सांगणार ‘बोलक्या भिंती’

वेंगुर्लेचा इतिहास सांगणार ‘बोलक्या भिंती’

sakal_logo
By

72953
72954
वेंगुर्ले ः शहरातील भिंतींवर काढण्यात आलेली भित्तीचित्रे.


वेंगुर्लेचा इतिहास सांगणार ‘बोलक्या भिंती’

भित्तीचित्रातून संस्कृती; पालिकेतर्फे पूर्ण शहरात काम सुरू

दिपेश परब ः सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर छाप निर्माण केलेले वेंगुर्ले शहर पर्यटकांना आपले वेगळेपण सांगण्यासाठी सज्ज होत आहे. शहराचे सौदर्य वाढवण्यासाठी भित्तीचित्रातून येथील संस्कृती मांडली जात आहे. या संकल्पनेवर सध्या काम सुरु असून ती पूर्णत्वास आल्यावर वेंगुर्लेला आणखी एक नवी ओळख मिळणार आहे.
वेंगुर्ले शहर स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर झळकले. अनेक पुरस्कार येथील पालिकेला मिळाले. शहरात स्वच्छतेची सवय तर सर्व नागरिकांना आहेच, ही स्वछता टिकवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी प्रयत्न करतच आहेत; मात्र त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी शहराचे सौंदर्यीकरण देखील तेवढेच महत्वाचे आहे. स्वच्छतेसोबतच शहर सौंदर्यीकरणात अव्वल यावे याचा विचार करून पालिकेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या संकल्पनेतून शहरात ठिकठिकाणी भित्तीचित्रे रेखाटण्याचे काम सुरु असून वेंगुर्ले शहर सजत आहे.
वेंगुर्ले हे ऐतिहासिक शहर आहेच शिवाय या प्रांताने अनेक लेखक, कलाकार, विचारवंत, खेळाडू या देशाला दिले. ही सर्व माणसे या वेंगुर्लेत लहानाची मोठी होत असताना जे जीवन जगले ती जीवनशैली या सर्व भित्ती चित्रातून पर्यटकांना दिसावी, हा सुद्धा यामागे एक महत्वाचा उद्देश आहे. कोकणातील, दशावतार, लोककला, गावरहाटीचा शिमगा, एकही पैसा न खर्च करता खेळता येणारे त्या वेळचे खेळ या सर्व गोष्टींचा या भित्ती चित्रामध्ये समावेश होणार आहे. नवीन पिढीला, पर्यटकांना वेंगुर्लेची ओळख ही चित्रे नुसती पाहून येणार आहे. शहरात फिरताना जुन्या वेंगुर्लेची आणि वेंगुर्लेच्या वैभवाची कल्पना यावी हा सुद्धा मुख्य हेतू या भित्ती चित्रामागे आहे. यात केवळ स्वच्छतेचे संदेश लिहून न थांबता या संदेशाबरोबरच ''स्वच्छ वेंगुर्ल्याबरोबरच सुदृढ, वैभवशाली, सांस्कृतिक, साक्षर वेंगुर्ला'' असे संदेश ठिकठिकाणी या भित्तिचित्रांमार्फत देण्यात येणार आहेत. ही संकल्पना शहराचे स्वच्छता दुत सुनील नांदोस्कर यांनी मुख्याधिकारी कंकाळ यांच्याकडे मांडली. ती मुख्याधिकारी यांनी तात्काळ अंमलात आणली आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात पुढील काळात अधिक भर पडेल यात शंका नाही.
--------------
चौकट
आकर्षक ‘टॅगलाईन्स’
वेंगुर्ले शहरात ही चित्रे कंपोस्ट डेपो, त्रिकोणी गार्डन, मच्छिमार्केट, शाळा नं. ३, वेंगुर्ला बंदर, पॉवर हाऊस येथील झांट्ये काजू, गाडीअड्डा कॉर्नर, वेंगुर्ला मार्केट, वाहन पार्किंग ठिकाणी, परुळेकर दत्तमंदिर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणच्या भिंती यावर काढण्यात येत आहेत. यात खेळाच्या भिंतीवर ''स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला, आणि सुदृढ वेंगुर्ला'' म्हटले आहे. काजू उद्योगाचा इतिहास भिंतीवर मांडताना ''स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि वैभवशाली वेंगुर्ला'' असे जाणीवपूर्वक सांगितले आहे. अशाच प्रकारे दशावताराच्या चित्राखाली ''स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि सांस्कृतिक वेंगुर्ला'' असा संदेश लिहिला आहे. शाळेच्या भिंतीवर ''स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि साक्षर वेंगुर्ला'' असे लिहिले आहे. वेंगुर्ला पालिकेने एका खासगी कंपनीमार्फत स्वच्छता दूत सुनील नांदोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात हे सर्व पूर्ण होऊन नंतर शहर सौंदर्यीकरण स्पर्धेच्या दृष्टीने याचे परीक्षण होणार आहे.
-------------
कोट
राज्य शासनामार्फत संपूर्ण राज्यामध्ये शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे . याअंतर्गत वेंगुर्ले शहरामध्ये सुशोभीकरणाची विविध कामे करण्यात येत आहेत. वेंगुर्ले शहराला उत्कृष्ट असा सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेला आहे. हाच वारसा लक्षात घेऊन वेंगुर्ले शहरामध्ये ठिकठिकाणी वेंगुर्ल्याची स्थानिक कला, संस्कृती , उत्सव इत्यादींची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. या सर्वांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहराची कला, संस्कृती, पारंपरिक उत्सव याचा प्रसार देशभर होऊन वेंगुर्ल्याच्या नावलौकिकात नक्कीच भर पडेल.
- परितोष कंकाळ, मुख्याधिकारी, वेंगुर्ले