वेळ वाचणार, वाहतूक वाढणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेळ वाचणार, वाहतूक वाढणार!
वेळ वाचणार, वाहतूक वाढणार!

वेळ वाचणार, वाहतूक वाढणार!

sakal_logo
By

73175
करुळ ः घाटातील रस्ता सद्यस्थितीत वारंवार केलेल्या डागडुजीमुळे खराब झाला आहे.

वेळ वाचणार, वाहतूक वाढणार!

काँक्रीटीकरणानंतरची करुळ घाटाची स्थिती; दोन महामार्गांत अवघ्या दोन तासांचे अंतर शक्य

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ ः मुंबई-गोवा आणि पुणे-बेंगलोर या दोन मोठ्या महामार्गाना जोडणाऱ्या आणि प्रतीक्षेत असलेल्या तळेरे-कोल्हापूर मार्गावरील ५६ टक्के लांबीच्या रस्ता काँक्रीटीकरणाला अखेर मंजुरी मिळाली आहे. हे काम झाल्यानंतर या दोन महामार्गांना जोडण्यासाठी वाहनांना लागणारा वेळ साडेतीन तासावरुन दोन तासांवर येणार आहे. यामुळे या मार्गावरुन आणि अर्थात करुळ घाटातून होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या या महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा हजारो वाहनचालक, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पूर्ण झालेला पुणे-बेंगलोर महामार्ग आणि सध्या सुरू असलेला मुंबई-गोवा या दोन मोठ्या महामार्गांना जोडण्याचे काम तळेरे-कोल्हापूर हा महामार्ग करतो. या महामार्गावरून रोज ३२ हजार मेट्रीक टन वाहतूक सुरू असते; परंतु दोन-तीन वर्षांत या महामार्गाची दुरवस्था झाली. ८४ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे वाहनचालक, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी मेटाकुटीस आले होते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांनी हा मार्ग बदलत अन्य मार्गाचा पर्याय निवडला. त्याचा परिणाम ४० टक्के वाहतूक घसरणीवर झाला. या मार्गावरील करूळ घाटाची अवस्था तर बिकटच बनलेली आहे. सलग तीन वर्षे हा घाट अवजड वाहतुकीस धोकादायक होता. त्याचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादकांना बसला होता. गेल्या वर्षी एप्रिल अखेरपर्यंत ऊसतोडणी सुरू होती. त्यामुळे ऊस उत्पादनात ३५ टक्के घट झाली. व्यापाऱ्यांना सर्वच बाबतीत महामार्गाचा फटका बसत होता. पर्यटकांची ये-जा कमी झाल्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे हा रस्ता काँक्रीटीकरण व्हावा, अशी मागणी लोकांमधून होत होती.
---
सततच्या पाठपुराव्याला यश
राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने जुनमध्ये या कामांचा प्रस्ताव तयार केला. प्रस्तावात एक दोन वेळा वरिष्ठ कार्यालयाकडून काढलेल्या त्रुटी अधिकाऱ्यांनी तातडीने दूर केल्या. याशिवाय सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर स्थायी व वित्त समितीने या कामाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी २४९.१३ कोटीच्या निधीसह मंजुरी दिली. दुसरीकडे कामाची निवीदा प्रकियाही सुरू केली आहे. येत्या २५ जानेवारीला या कामाचा मक्ता निश्चित होणार आहे. जिथे भूसंपादन, जलवाहिन्या आणि विज खांब स्थलांतराची क्लिष्ट प्रकिया नसेल, तेथे मार्चपासून काम सुरू होईल, अशी शक्यता आहे.
----
काम दर्जेदारच का व्हावे?
अनेक वर्षांनी मंजूर झालेले हे काम गतीने व्हायला हवे; परंतु तितकाच दर्जेदार, मजबुत, टिकाऊही व्हायला पाहीजे, अशा अपेक्षा सर्व घटकांतून व्यक्त होत आहेत. याचे कारणही तितकेच ठोस आहे. तळेरे-कोल्हापूर हा ८४ किलोमीटर लांबीचा रस्ता कापण्यास सर्वसाधारण वाहनांना तीन - साडेतीन तासांचा अवधी लागतो. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर किमान दोन तासांत मुंबई-गोवा महामार्गावरून पुणे-बेंगलोर महामार्गावर पोहोचता येणार आहे. दर्जेदार रस्त्यामुळे या महामार्गावरील वाहतूकही वाढणार असून महामार्गालगतच्या बाजारपेठांना त्याचा फायदा होणार आहे.
------------
कोट
महामार्गावरील २१ किलोमीटरचा रस्त्याला मंजूरी मिळाली असून जानेवारीच्या अखेरीस मक्ता निश्चित होईल. त्यानंतर अन्य काही प्रकिया पार पडण्यास महिनाभराचा कालावधी अपेक्षित असतो. ज्याठिकाणी भुसंपादन प्रकिया, विजखांब किंवा जलवाहिन्या स्थंलातराची प्रकिया नाही, तेथे मार्चपासून काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण
------------
कोट
मंजूर रस्ता लवकरात लवकर व्हावा, त्याचप्रमाणे तो दर्जेदार झाला पाहिजे. नादुरूस्त रस्त्यांचा आम्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाच तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले.
- अरविंद रावराणे, ऊस उत्पादक शेतकरी तथा माजी सभापती, वैभववाडी
------------
कोट
नादुरूस्त घाटरस्त्यांमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या भुईबावडा घाटमार्गे वाहतुक सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना महामार्गामुळे त्रास होणार नाही याची दक्षता महामार्ग प्रधिकरणने घ्यावी.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
----------
कोट
बहुतांशी व्यापाऱ्यांचा माल हा कोल्हापूरहुन येत असतो. हा सर्व माल या महामार्गाने वाहतुक करण्याशिवाय गत्यंतर नसते. गेली दोन वर्ष आम्ही मेटाकुटीला आलो आहोत. हा रस्ता मंजूर होणे गरजेचे होते. परंतु, काम मजबुत व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- मनोज सावंत, माजी अध्यक्ष, व्यापारी मंडळ, वैभववाडी
-----------
महामार्गावर एक नजर
- ८४ किलोमीटर लांबीपैकी ४७ कि.मी.च्या क्राँकीटीकरणाला मंजुरी
- या रस्त्यांची रूंदी सात मीटर आणि रस्त्यांच्या दोनही बाजुला दीड दीड मीटर काँक्रीटचा फुटपाथ
- रस्त्यांची जाडी साधारणपणे २५ सेंटीमीटर