
रत्नागिरी ः तुडतुडा, फळगळीसह आंब्यावर पुनर्मोहोराचे संकट
rat४p१.jpg
73127
रत्नागिरीः अजूनही काही झाडांना पालवी आहे.
-----------------
आंब्यावर पुनर्मोहोराचे संकट
बदलत्या वातावरणामुळे तुडतुडा, फळगळही; फवारणीच्या खर्चात वाढ
रत्नागिरी, ता. ४ः बदलत्या वातावरणामुळे आंब्यावर तुडतुडा, फळगळ आणि पुनर्मोहोराचे संकट बागायतदारांपुढे आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी परिस्थितीनुसार किटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कोकण कृषी विद्यापिठाने दिला आहे. दर चार दिवसांनी वातावरण बदलत असल्यामुळे फवारणीच्या खर्चात वाढ झाली असून तुलनेत उत्पन्न जैसे थे अशी स्थिती आहे.
यंदाच्या आंबा हंगामाची सुरवात रडतखडत होणार हे आताच निश्चित झाले आहे. हापूस कलमांना मोहोरात रूपांतर होण्यास कालावधी लागला. त्यानंतर मोहोराला फळधारणा करण्याचा कालावधीही लांबत आहे. अजूनही अनेक ठिकाणी मोहोर आलेला नाही. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात हापूस उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. पालवी, मोहोर व फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. तुडतुडे मोहोरातील कोवळ्या फळातील रस शोषून घेतल्यामुळे मोहोराची गळ होते. या सोबतच तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात आणि तो पानांवर पडल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढते. तुडतुड्यामुळे आर्थिक नुकसान होते. मोहोर अवस्थेतील झाडांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यावर कीटकनाशकाची फवारणी हा एकमेव उपाय आहे तसेच किमान तापमानात प्रमाणापेक्षा अधिक घट झाल्यामुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराच्या फळांची गळ होते. यासाठी मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुर्नमोहोर प्रक्रिया टाळण्यासाठी औषध फवारणी करण्याचा पर्याय बागायतदारांपुढे असतो. फळांची गळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाडास या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या दिल्यास ती थांबू शकते, असा सल्ला विद्यापिठाकडून देण्यात आला आहे.
चौकट
फवारणी सकाळी करावी
बागेतील परागीकरण करणाऱ्या किटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी फवारणी करण्याची गरज असल्यास परागीकरणाचा कालावधी वगळून म्हणजेच सकाळी ९ ते १२ फवारणी करावी. कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी, असा सल्ला कोकण कृषी विद्यापिठाने दिला आहे.