
आरोंद्यात बेकायदा वाळू उपशावर छापा
73301
आरोंदा ः येथे वाळू उपशासाठी जप्त केलेली होडी.
73302
आरोंदा ः येथे बुधवारी सायंकाळी मच्छीमारांशी चर्चा करताना तहसीलदार अरुण उंडे.
आरोंद्यात बेकायदा
वाळू उपशावर छापा
तेरेखोल खाडीपात्र रुंदावल्याने धोका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः आरोंदा-सावरजुवा येथे तेरेखोल खाडीत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर येथील महसूल पथकाने आज छापा टाकत चार ब्रास वाळू, होडी जप्त केली. तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी धोंडी पास्ते व पथकाने ही कारवाई पहाटे केली.
आरोंदा खाडीपत्रात कित्येक वर्ष गोव्यातील व सिंधुदुर्गातील काही वाळूमाफियांकडून परप्रांतीय कामगाराच्या साहाय्याने चोरटा वाळू उपशा सुरू आहे. याबाबत आरोंदा ग्रामस्थ तसेच मच्छीमार बांधकाकडून महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष होत होते. वाळू उपशामुळे तेरेखोल खाडीपात्र रुंदावत चालले आहे. परिणामी माड बागायती उद्ध्वस्त होऊन खाडीकिनारी असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्री वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीय कामगारांकडून खाडीपात्रात मासेमारी करायला जाणाऱ्या मच्छीमार बांधवांनाही धमकावण्याचे प्रकारही सुरू होते. होडीचे नांगर अडकून जाळ्यांचेही मोठे नुकसान होत होते. याबाबत अलीकडेच आरोंदा येथील मच्छीमार बांधवांकडून प्रांत प्रशांत पानवेकर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. भविष्यात मच्छीमार व वाळू माफियांत संघर्ष झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी असा इशाराही दिला होता.
मच्छीमारांच्या भूमिकेनंतर प्रशासनाने आरोंदा-सावरजुवा येथे तेरेखोल खाडीपात्रात परप्रांतीय कामगारांकडून वाळू उपसा सुरू असल्याची खात्री करत पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. या वेळी वाळू उपसा करणारे परप्रांतीय कामगार होडी तेथेच सोडून पळून गेले. कामगारांच्या झोपड्या, बेकायदेशीर रँपही मोडून टाकण्यात आले. दरम्यान, वाळूने भरलेला डंपर घेऊन चालक फरार झाला.
सायंकाळी उशिरा तहसीलदार उंडे यांनी भेट देऊन मत्स्य व्यावसायिकाशी चर्चा केली तसेच कारवाई अशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासनही दिले. जप्त केलेली होडी कोणाची याबाबत शोध घेऊन कारवाई करू, असेही त्यांनी मच्छीमारांना सांगितले.