
सिंधुदुर्गात व्यसनमुक्ती केंद्र हवे
73823
कणकवली : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना नशाबंदी मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी निवेदन दिले.
सिंधुदुर्गात व्यसनमुक्ती केंद्र हवे
नशाबंदी मंडळाची मागणी; पालकमंत्री चव्हाण यांना निवेदन
कणकवली, ता. ७ : युवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सिंधुदुर्गात व्यसनमुक्ती केंद्राची नितांत आवश्यकता आहे. सध्या एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. गोपुरी आश्रमाने केंद्र सरकारकडे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करा, अशी मागणी नशाबंदी मंडळाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
नशाबंदी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा अर्पिता मुंबरकर, जिल्हा सन्वयक मेघा गांगण यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी त्यांना सिंधुदुर्गात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले. अर्पिता मुंबरकर म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी व्यसनमुक्ती प्रचार आणि प्रसार मोहीमही राबवत आहोत; मात्र पूर्णत: व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्र होण्याची नितांत गरज आहे.’’
मुंबरकर म्हणाल्या, ‘‘प्रामुख्याने तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही बाब पालकांनाही चिंतेचा विषय ठरली आहे. मुलांच्या व्यसनाधीनतेचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला आणि प्रामुख्याने महिलांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात व्यसनमुक्ती केंद्र तातडीने सुरू होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. दरम्यान, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यसनमुक्त केंद्राबाबत केंद्रस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.’’