पावस-गावखडी, माडबन किनारी 402 अंड्यांचे संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-गावखडी, माडबन किनारी 402 अंड्यांचे संवर्धन
पावस-गावखडी, माडबन किनारी 402 अंड्यांचे संवर्धन

पावस-गावखडी, माडबन किनारी 402 अंड्यांचे संवर्धन

sakal_logo
By

गावखडी, माडबन किनारी ४०२ अंड्यांचे संवर्धन

वनविभागाकडून संरक्षण ः कासवाची तीन घरटी सापडली
पावस, ता. ८ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी आणि राजापूर तालुक्यातील वेत्ये व माडबन या समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संवर्धन वनविभागामार्फत सुरु आहे. गावखडी येथे २७८ अंडी संरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन घरटी सापडली आहेत. माडबन येथेही कासवाची १२४ अंडी सापडली असून ही सर्व अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. ५५ ते ६० दिवसांत या घरट्यांमधून पिले बाहेर पडून समुद्रात सोडण्यात येणार आहेत.
गावखडी, माडबन, व्येत्ये याठिकाणी दरवर्षी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. त्यामुळे येथे वनविभागामार्फत या अंड्यांचे संवर्धन केले जात आहे. यावर्षी या समुद्रकिनाऱ्यावर कासवांनी अडी घातली आहेत. त्यामध्ये गावखडी किनाऱ्यावर १२ डिसेंबर २०२२ ला कासवाने पहिले घरटे तयार केले. त्यामध्ये १२७ अंडी आढळली आहेत. २ जानेवारीला दुसरे घरटे सापडले असून या घरट्यात १५१ अंडी आहेत. या दोन्ही घरट्यांमध्ये मिळून २७८ अंडी असूनही ही सर्व अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. माडबन येथेही १२ डिसेंबरला घरटे सापडले असून यामध्ये १२४ अंडी आहेत.
रत्नागिरीतील गावखडी, माडबन, व्येत्ये समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या घरटयांचे सवंर्धन रत्नागिरी वनपरिक्षेत्रामार्फत करण्यात आले आहे. या संरक्षित केलेल्या घरट्यांमधून ५५ ते ६० दिवसानंतर पिल्ले बाहेर येणार आहेत. या घरट्यावर वनविभागातर्फे लक्ष ठेवण्यात येणार असून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात येणार आहे. या घरट्यांना संरक्षणासाठी कासवमित्रांची मदत घेण्यात आली आहे.