
नुकसानीचा प्रस्ताव पाठवा
rat१०४३.txt
बातमी क्र..४३ ( पान ३)
फोटो- ratchl१०८.jpg ः
७४५६८
चिपळूण ः प्रांतधिकाऱ्यांना निवेदन देताना आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे पदाधिकारी.
आदिवासी विकास प्रकल्पाकडे प्रस्ताव पाठवा
आदिवासी कुटुंबांचे नुकसान ; गाळ उपशामुळे बांधणे उद्ध्वस्त
चिपळूण, ता. १० ः वाशिष्ठी नदीतील गाळ उपशामुळे बांधणे उद्ध्वस्त होऊन आदिम-आदिवासी समाजातील कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. रोजीरोटीवर गदा येऊन या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदिवासी आदिम कातकरी संघटनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेतली. नुकसानीचा प्रस्ताव तातडीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
कातकरी या आदिम-आदिवासी समाजातील कुटुंबे नद्यांमध्ये मासेमारी करून उपजिविका करत असतात. तालुक्यातील सती पुलानजीक वाशिष्ठी नदीपात्रात अशाप्रकारे लगतच्या पिंपळी खुर्द गावातील दहा कुटुंबांनी १४ बांधणे बांधली होती. या प्रत्येक बांधणीसाठी मजुरी, साहित्य आदी मिळून प्रत्येकी २७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यातून आदिवासी कुटुंबांची उपजीविका सुरू होती; मात्र २१ नोव्हेंबर २०२२ ला जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीत गाळ काढताना जेसीबीद्वारे तेथील १४ बांधणे उखडून टाकली. यामध्ये या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे ती नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी यासाठी आदिवासी आदिम कातकरी संघटनेने सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला आहे.
प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्याने आदिवासी आदिम कातकरी संघटनेने या कुटुंबांसमवेत १२ डिसेंबरला एक दिवसाचे बांधण धरणे सत्याग्रह आंदोलनही छेडले होते. याबाबत त्यांनी प्रशासन व शासन यांच्याकडे पाठपुरावादेखील सुरू ठेवला आहे. सोमवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इंदुलकरांसमवेत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेत चर्चा केली तसेच मागणीचे निवेदनही दिले. या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, तालुकाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष दिनेश पवार, सचिव महेश जाधव, सल्लागार मनोहर जगताप, खजिनदार गोपीचंद निकम, सामाजिक कार्यकर्ते नितेश निकम, विठ्ठल निकम, संतोष निकम आदी उपस्थित होते.