
शिंदे गटात गेल्याच्या बातम्या साफ खोट्या
74667
राजन परब
शिंदे गटात गेल्याच्या
बातम्या साफ खोट्या
राजन परब ः मी राणेंसोबतच
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात गेलेलो नाही. मी शिंदे गटात गेल्याच्या प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी प्रतिक्रिया कसालचे नवनिर्वाचित सरपंच राजन परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
कसालचे नवनिर्वाचित सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य राजन परब हे राणे समर्थक म्हणून ओळखले जातात; मात्र अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते अपक्ष म्हणून सरपंच निवडणूक लढले आणि जिंकूनही आले. या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा ६० मतांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर परब हे शिंदे गटात गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत परब यांनी प्रसिद्धी पत्रकातून प्रतिक्रिया दिली. त्यात म्हटले आहे की, मी शिंदे गटामध्ये गेलो, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत; मात्र तसा कोणताही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. कुडाळच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित नव्हतो. तरीही ‘कसाल सरपंच राजन परब शिंदे गटात’, अशी बातमी प्रसिद्ध झाली; मात्र त्या संदर्भात माझा कोणताही संबंध नाही. मी केंद्रीय मंत्री राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षात किंवा गटामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना तसा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. कसाल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी अपक्ष म्हणून लढलो आणि कसालमधील सर्व मतदारांनी मला सरपंच म्हणून निवडून दिले. हे माझ्यावर असलेले माझ्या गावातील सर्वांचे प्रेम आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच जणांनी माझे अभिनंदन केले. त्यामध्ये शिंदे गटाचे चंद्रशेखर राणे हेही होते. ते माझे मित्र आहेत; मात्र त्याचा अर्थ मी शिंदे गटात गेलो असा होत नाही. मी अद्यापही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाच कार्यकर्ता आहे.