वाहतूक नियमांचे पालन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांचे पालन करा
वाहतूक नियमांचे पालन करा

वाहतूक नियमांचे पालन करा

sakal_logo
By

74794
सिंधुदुर्गनगरी : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्‍घाटन करताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, अनामिका जाधव आदी.

वाहतूक नियमांचे पालन करा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी; रस्ता सुरक्षा सप्ताहाचे सिंधुदुर्गनगरी येथे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. २०२३ वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे उद्घाटन आज झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सिंधुदुर्गनगरी परिसरातील कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टेबल कॅलेंडर, माहिती पत्रक यांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेची शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी, केंद्र, राज्य, जिल्हा वार्षिक योजना यांच्या विकास निधीमध्ये रस्ते विकासाला जास्तीत जास्त निधी दिला जातो; परंतु प्रशासनाकडून रस्ते विकासाची कामे करताना त्याचा दर्जा चांगला होईल यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना शिस्त असावी, यासाठी प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर वाहनचालकांनीही सुरक्षितपणे व जबाबदारीने वाहन चालविण्यासह सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी बोलताना, आपल्या देशात जगाच्या १ टक्के इतकी वाहने असून जगाच्या १३ टक्के इतके रस्ते अपघात होतात. देशामध्ये प्रत्येक मिनिटाला एका अपघाताचे प्रमाण आहे. तर अपघातामुळे प्रत्येक चार मिनिटांत एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागतो. अपघातामध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण ५३ टक्के इतके आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे, वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे याबरोबर सुरक्षित वाहन चालविणे आवश्यक आहे. पोलिस विभाग वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतो, ती त्यांच्या सुधारणेसाठीच असते. अपघात घडल्यास मदतीसाठी शासकीय यंत्रणा पोहोचत असतेच; परंतु, जवळ असणाऱ्या लोकांनीही तातडीने मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी महामार्गालगत व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी दुभाजक काढणे, अतिक्रमण करणे असे प्रकार करू नयेत, असे आवाहन केले. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. चुकीच्या मार्गाने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये. ज्या ठिकाणी अपघात घडेल, त्यावेळी जवळ असणाऱ्या व्यक्तींना तातडीने मदत करावी, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जमीन भूसंपादन झाले तरी नागरिक अतिक्रमण करीत असतात. मोकाट जनावरे रस्त्यावर सोडली जातात. वाहन चालक लेन सोडून वाहने चालवतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे सांगितले. ट्रक चालक मालक संघटनेचे शिवाजी घोगळे यांनी प्रशासनाने रस्त्याची कामे दर्जेदार करून घ्यावीत, अशी मागणी केली.
.................
चौकट
वर्षभरात १८७ जणांनी गमावले अपघातात प्राण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्ह्यामध्ये २ लाख ७२ हजार ५७१ इतकी सध्या नोंदणीकृत वाहने आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४८६ अपघात झाले असून यामध्ये २८५ गंभीर अपघात आहेत. यामध्ये १८७ जणांनी आपले प्राण गमावले असल्याचे सांगितले.
...............
चौकट
‘आपदा मित्र’चे १०० युवकांना प्रशिक्षण
जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०० युवकांना आपदा मित्रचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. आणखी १५० युवकांना आपदा मित्रचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या आपदा मित्रांना अपघात घडल्यानंतर तातडीने मदत कशी करावी, याबाबत प्रशिक्षित करण्यात येते. जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षिणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.