
दिव्यांग संघटना राणेभेट
दिव्यांग बांधवांच्या
समस्या मार्गी लावा
नीतेश राणेंना साकडे; विविध मागण्यांचे दिले निवेदन
कणकवली, ता. १२ : चार टक्के आरक्षण असूनही दिव्यांग बांधवांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. पेन्शन वेळेवर मिळत नाही. तसेच विविध योजनांचाही लाभ मिळत नाही. या सर्व समस्या मार्गी लावा असे साकडे एकता दिव्यांग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांना घातले.
एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्षसुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिन सादिये, पत्रकार मयुर ठाकूर आदींनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. दिव्यांगांसाठी अनेक योजना असल्या तरी त्यातील अटींमुळे त्याचा लाभ घेता येत नाही. नोकर भरतीत असलेली ४ टक्के आरक्षण आहे. मात्र भरतीवेळी काही तरी नियम काढून दिव्यांगांना नोकर भरतीमधून बाहेर काढले जाते. उद्योग, व्यवसायासाठी विविध योजना असल्या तरी बँका कर्जपुरवठा करत नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न असल्याचे राणेंना सांगण्यात आले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. दरम्यान यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये निराधार योजनेची पेन्शन एक हजार ऐवजी पाच हजार रूपये करण्यात यावी. प्रत्येक नोकर भरतीवेळी दिव्यांगांना आरक्षणानुसार सामावून घ्यावे. घरकुल योजनेचे अनुदान साडे तीन लाख रूपये करावे, दिव्यांगाच्या वाहन परवान्याबाबत धोरण निश्चित व्हावे, दिव्यांगांच्या कर्ज प्रकरणांसाठी स्वतंत्र बँक असावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.