
नवोपक्रम स्पर्धेत प्रशांत चिपकर प्रथम
नवोपक्रम स्पर्धेत प्रशांत चिपकर प्रथम
वेंगुर्ले ः महाराष्ट्र शासनाच्या संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेमार्फत आयोजित नवोपक्रम स्पर्धा २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोली क्रमांक दोनचे पदवीधर शिक्षक प्रशांत चिपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ते राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. नवोपक्रमांच्या माध्यमातून कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेणाऱ्या सर्वस्तरातील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला व सृजनशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दाभोली क्रमांक २ वेंगुर्लेचे पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांचा ‘आवडीचे डोही आनंद तरंग, कलेचा व्यासंग करी मोबाईल व्यसनाधीनता भंग’ हा नवोपक्रम जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. चिपकर यांनी २०२१-२२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतही राज्यात पाचवा क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर २०२१-२२ मध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्येही प्राथमिक शिक्षक गटातून शैक्षणिक साहित्य निर्मितीतही त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
---
कमी दरात भूखंड देण्याची मागणी
दोडामार्ग ः आडाळी येथील एमआयडीसीमधील भूखंड उद्योजकांना वितरित करून स्थानिक भूमिपुत्रांना कमी दरांमध्ये हे भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन गवस यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले होते. स्थानिक भूमिपुत्रांना कमी दरांमध्ये ते उपलब्ध करून देण्याची मागणी गवस यांनी केली होती. त्या अनुषंगाने एकूण २१० भूखंड वाटपाची जाहीर सूचना अलीकडेच वर्तमानपत्रात गेल्या महिन्यात दिली असून ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये १ हजार २८७ रुपये प्रति चौमी औद्योगिक, २ हजार १२३ रुपये प्रति चौ.मी. व्यापारी तर १ हजार ९३१ प्रति चौमी निवासी असे दर या भूखंडाचे ठरविण्यात आल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाने गवस यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
-----------------------
कालवा दुरुस्ती मागणीची दखल
ओटवणे ः माडखोल (ता.सावंतवाडी) धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही गेली तीन वर्षे काम करण्यास टाळाटाळ केली. याबाबत सातत्याने लक्ष वेधूनही अधिकारी वर्गासह ठेकेदारांच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे संबंधितांच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी या धरणाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी तिलारी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. दरम्यान, माडखोल धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी १४ ला सकाळी १० वाजता माडखोलमध्ये लाभधारक शेतकऱ्यांसह संयुक्त क्षेत्रीय पाहणी करून त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे खात्याचे सावंतवाडीचे प्रभारी उपभियंता पी. आर. पाटील आणि कनिष्ठ अभियंता आर. एस. जोशी यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.
---
रस्ता दुरुस्तीबाबत नीलेश राणेंना निवेदन
मालवण ः गोठणे-आचरा मुख्य रस्ता मुख्य रस्ता ते यशवंतवाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे-गावठण-घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची मागणी करणारे निवेदन माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे गोठणे ग्रामस्थांनी सुपूर्द केले. यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, गोठणे येथील दयाळ हाटले, उपसरपंच बाळा परब उपस्थित होते.