
किरकोळ कारणावरून मोटारचालकाला बदडले
75371
वैभववाडी ः येथील संभाजी चौकात हाणामारी झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
किरकोळ कारणावरून
मोटारचालकाला बदडले
वैभववाडीतील प्रकार; प्रकरण पोलिसांत
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः किरकोळ कारणावरून येथील संभाजी चौकात एका मोटारचालकाला दुचाकीवरील चौघांनी बदडले. प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर आपसात मिटविण्यात आले. हा प्रकार आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
मोटार आणि दुचाकीस्वारांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दीक चकमक उडाली. त्याचे रूपांतर हाणारीत झाले. दुचाकीवरील चौघांनी मोटारचालकाला भरचौकात मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्यांनी मारहाण होत असलेली पाहून अनेकांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु, तरीदेखील त्या मोटारचालकाला चौघे बदडत होते. या हाणामारीत गळ्यातील सोनसाखळ्या तुटल्या. दरम्यान, मोटारचालक तातडीने पोलिसांत गेला. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिसांनी सर्वांना पोलिस स्थानकात नेले. हा प्रकार पाहण्यासाठी संभाजी चौकात मोठी गर्दी झाली होती. पोलिस स्थानकात दोन्ही बाजूंनी सामंजस्याने प्रकरण मिटवित असल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधितांना नोटीस दिली.