दीप्ती यादव यांना शिक्षिका पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीप्ती यादव यांना शिक्षिका पुरस्कार
दीप्ती यादव यांना शिक्षिका पुरस्कार

दीप्ती यादव यांना शिक्षिका पुरस्कार

sakal_logo
By

प्रश्नमंजूषेत ज्ञानदीप विद्यामंदिरचे सुयश
खेडः तालुक्यातील भडगाव येथील (कै.) प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरने ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजूषा स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. नववी ते बारावी गटातून राधिका रांगडे व वेदिका माने यांनी तालुकास्तरावर प्रश्नमंजूषा स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना विनोद टेंबे, रागिणी जामकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
------------
खेडमध्ये पोषण आहार योजनेची जनसुनावणी
खेडः शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन जनसुनावणी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या जनसुनावणीत शासनाच्या सामाजिक अंकेक्षण विभागाचे जयदेव, रांजणकर, प्रतिनिधी गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, सुनावणी समिती सदस्य सुनील तांबे, शिक्षण विस्तार अधिकारी पाटोळे, महबूब फकीर, शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक हर्षल घाडगे यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा प्रतिनिधीक स्वरूपात २२ शाळांचे मुख्याध्यापक, पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. जनसुनावणीदरम्यान ऑडिटद्वारे शालेय पोषण आहार अहवाल, चव रजिस्टर मदतनीस करार, फिटनेस प्रमाणपत्र, मानधन, किचनशेड स्थिती, हॅण्डवॉश स्टेशन, योजनेचे माहिती फलक, लोगो फलक, लाभार्थी विद्यार्थी संख्या, तक्रारपेटी, आपत्कालीन नंबर फलक, अग्निशमक यंत्र अद्ययावत, स्वच्छतागृहस्थिती याबाबत सोशल ऑडिट झालेल्या शाळांना केलेल्या सूचनांची शाळांनी केलेली पूर्तता याची प्रत्यक्ष पुराव्याद्वारे पाहणी करून खातरजमा करून ती प्रकरणे पॅनलचे अध्यक्ष शरद भोसले व सदस्यांनी सुनावणीदरम्यान निकालात काढली.
---------------
एमएसआयबीएम महाविद्यालयात
कंपनी सेक्रेटरीचे अभ्यास केंद्र
खेडः येथील सहजीवन शिक्षणसंस्था संचलित मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेसन मॅनेजमेंट एमएसआयबीएम महाविद्यालयाने इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) बरोबर करार करून कंपनी सेक्रेटरी या कोर्सचे, अभ्यास केंद्र सुरू केले आहे. सीएस ऐश्वर्या तोरसकर (चेअरमन, कोल्हापूर चाप्टर ऑफ कंपनी सेक्रेटरी) आणि महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराथी, डायरेक्टर डॉ. प्रसाद भणगे व आयसीएसआय समन्वयक राजश्री लांबे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सहजीवन शिक्षणसंस्थेचे सेक्रेटरी मंगेश बुटाला यांनी या अभ्यासकेंद्राचा फायदा बारावीनंतरच्या तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे सांगितले. महाविद्यायाचे चेअरमन नंदकुमार गुजराथी यांनी या अभ्यासकेंद्रामुळे कोकण परिसरातील कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी पुणे, मुंबईकडे जावे लागणार नसल्याचे सांगितले.
----------------
rat१६p४.jpg
75898
खेडः दीप्ती यादव यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
-----------
दीप्ती यादव यांना शिक्षिका पुरस्कार
खेड ः तालुक्यातील वाडीबीड शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रसिद्ध कवयित्री, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तालुक्यात परिचित असलेल्या दीप्ती यादव यांना नुकताच आविष्कार फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार गणपतीपुळे या ठिकाणी प्रदान करण्यात आला. आविष्कार फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. एक उत्तम लेखिका, उत्तम कवयित्री, आदर्श शिक्षिका व कलागुणांची देणगी लाभलेल्या अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळवलेल्या, अनेक कवितालेखन स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळवलेल्या यादव यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर खेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
------
rat१६p३७.jpg ः
76002
निधी धरणकर
--------------
निधी धरणकरचे सुयश
पावस ः राजापूर तालुक्यातील कशेळी येथील वि. सी. गुर्जर विद्यामंदिरची विद्यार्थिनी निधी धरणकर हिने सन २०२२ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आठवीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये ९५ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. तसेच २०२२ या वर्षी झालेल्या एनएमएमएस या परीक्षेमध्येही तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे. या यशासाठी मुख्याध्यापक लाड, शिक्षक कांबळे, काका संतोष धरणकर, आई-बाबा यांचे मार्गदर्शन लाभले.
------
rat१६p३३.jpg
75996
दापोलीः शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचा गौरव करताना जिल्हाप्रमुख सचिन कदम.
----------
दापोलीत ठाकरे शिवसेनेच्या भगवा सप्ताहाचा प्रारंभ
दाभोळः दापोली तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज दापोली येथे भगवा सप्ताहाचा आरंभ शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते शिवसेना शहर शाखा येथे झाला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिष्यवृत्ती स्पर्धेत यश मिळवलेल्या दापोली तालुक्यातील ४८ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांचे हसे गौरव करण्यात आला. दापोली शहरातील पद्मश्रद्धा बॅंक्वेट हॉल येथे शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांसह क्रीडाक्षेत्रातील नैपुण्य प्राप्त केलेल्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला उपनेते अमोल किर्तीकर, युवासेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम, किशोर देसाई, तालुकाप्रमुख हृषिकेश गुजर, युवासेनेचे अजिंक्य मोरे, नगरसेवक आरिफ मेमन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------