चिपळूण ः 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे चिपळुणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे चिपळुणात
चिपळूण ः 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे चिपळुणात

चिपळूण ः 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे चिपळुणात

sakal_logo
By

पान 1 साठी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पाच फेब्रुवारीला चिपळुणात
लोककला महोत्सवाचे उद्‍घा‍टन; शोभायात्रेने प्रारंभ
चिपळूण, ता. १६ ः येथील लोककला महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या वतीने आयोजित पर्यटन लोककला सांस्कृतिक व कोकणी खाद्य महोत्सवाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच फेब्रुवारीला होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना महोत्सवाचे उद्‍घाटन करण्याची विनंती केली. त्याला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी येण्यास संमती दिली आहे. पहिल्या दिवशी सकाळी शोभायात्रेने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जुना कालभैरव व देवस्थानअंतर्गत बापू बाबाजी सागावरकर मैदानात दुपारी १२ वाजता उद्‍घाटन सोहळा होणार आहे.
चोरगे म्हणाले, ‘‘रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजता शोभायात्रा निघणार आहे. महोत्सवाच्या मंडपात नटराज व श्री देवी विंध्यवासिनीच्या मूर्तीचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर उद्‍घाटन होणार आहे. संदीप ताम्हणकर या कलाकाराने या मूर्ती साकारलेल्या असून लोटिस्मा संग्रहालयात त्या ठेवण्यात येणार आहेत. ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते १० या वेळेत पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यातील नमन, जाखडी, तारपानृत्य, घोरनृत्य, दशावतार, चित्तगती, धनगरी गजनृत्य, कुंभारक्रियेचा विधी, डेरा, नकटा, काटखीळ अशा विविध लोककला सादर होणार आहेत. मैदानात विविध कोकणी शाकाहारी, मांसाहारी पदार्थांचे ३० स्टॉल असणार आहेत. यानिमित शाश्वत पर्यटन या विषयावर अभ्यासकांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे.’’
कोकणच्या खाद्यसंस्कृतीवर मुलाखत, लोककलांच्या विश्वावर चर्चासत्र आणि विविध क्षेत्रांत कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. या चार दिवसांतील रोजची सायंकाळ ही विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होईल. लोटिस्माने उभारलेल्या व्यक्तिचित्र कलादालनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट देण्यास होकार दिल्याची माहितीही चोरगे यांनी दिली.
-------


उदय सामंत यांचे भरभरून सहकार्य
पालकमंत्र्यांनी महोत्सव भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाला ही उदय सामंत यांनी भरभरून सहकार्य केले होते. आता हा महोत्सवही त्यांच्या नेतृवाने यशस्वी होईल, असा विश्वास महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला आहे.