ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करा
ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करा

ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करा

sakal_logo
By

76566
शेगांव ः येथील महाराष्ट्र राज्य ग्रथालय संघाच्या अधिवेशनास उपस्थित ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्ते. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करा

डॉ. गजानन कोटेवार ः शेगांव येथील अधिवेशनाकडे मंत्र्यांची पाठ

मुणगे, ता. १८ ः सार्वजनिक ग्रंथालय सेवकांसाठीच्या कोणत्याही सोयी निश्चित नाहीत. वाढती महागाईबरोबर वाचन साहित्याच्या खर्चात झालेल्या वाढीचा त्यांना सामना करावा लागत आहे. याचा विचार करुन शासनाने ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट करावे, असे मत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यानी शेगांव येथील अधिवेशनात केले.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५७ वे अधिवेशन शेगांव येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कोटेवार होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. कोटेवार म्हणाले, ‘‘या अधिवेशनास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले होते; परंतु पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता असल्याने ते उपस्थित राहू शकत नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे हजारोच्या संख्येने राज्यभरातील उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. ते येतील या आशेपोटी हजारोंच्या संख्येने ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते; परंतु सर्वांची घोर निराशा झाली. राज्यभरातून आलेले हजारो ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्ते यांच्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शासनाने गेल्याच महिन्यात ग्रंथालयाच्या अनुदानामध्ये साठ टक्के वाढ करण्याबाबतचा शासन आदेश निघाला आहे; परंतु अद्याप त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही. याची तात्काळ अंमलबजावणी करावी. ग्रंथालयांना २०२२-२३ या वर्षासाठी अनुदान द्यावे.’’
----
...तर उग्र आंदोलन
गेली कित्येक वर्षे ग्रंथालय कर्मचारी आणि ग्रंथालय कार्यकर्ते अनुदान वाढ व्हावी, कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी या मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार मंत्रालयामध्ये हेलपाटे घालत आहेत; परंतु यामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे शासनाने आता तरी या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तिप्पट अनुदान वाढ आणि कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी उग्र आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कोटेवार म्हणाले.