अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसदलावर ताण

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसदलावर ताण

पोलिसदलापुढील आव्हाने भाग १... लोगो

इंट्रो
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसदलाने कंबर कसली आहे. शास्त्रोक्त आणि परंपरागत पद्धतीचा वापर करून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चहूबाजूंनी सुरक्षायंत्रणा अधिक भक्कम आणि सतर्क ठेवण्याचा निर्धार नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांनी अट्टल गुन्हेगारांना थेट इशाराच दिला आहे. गुन्हेगारांनो गुन्ह्यांपासून दुर राहा नाहीतर कठोर कारवाईला तोंड द्या, असे ठणकावले आहे; मात्र पोलिसदलापुढे गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी अनेक आव्हाने असून अपुऱ्या पोलिसदलापासूनच त्याची सुरवात होते. या आव्हानांचा वेध घेणारी मालिका आजपासून...
- राजेश शेळके, रत्नागिरी
-----------------

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसदलावर ताण
हजारो लोकांमागे १ पोलिस; एकूण पोलिस बळ १५७४
रत्नागिरी, ता. १९ः जिल्ह्याला गुन्हेगारीची फार मोठी किनार नसली तरी वाढत्या दळणवळणाच्या साधनामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीने जिल्ह्याला शिवले आहे. असे अनेक प्रकार उघडकीस आले असले तरी जिल्हा पोलिसदल अशा गुन्हेगारीला तेवढ्याच दमाने आणि ताकदीने तोंड देत आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये राज्यात जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे; परंतु जिल्हा पोलिसदलाला भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या आहे ती कमी मनुष्यबळाची. मनुष्यबळाच्या अभावमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. तपासातील गुणात्मक कामगिरीमुळे अजूनतरी खाकी वर्दीला जिल्ह्यात डाग लागेला नाही; मात्र लोकसंख्या आणि लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस यांच्यात मोठी तफावत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ७० हजारावर असून त्यांच्या दिमतीला फक्त १ हजार ५७४ पोलिस आहेत. म्हणजे १ हजार ५० लोकांमागे १ पोलिस असे हे कुठेही ताळमेळ न बसणारे विषम प्रमाण आहे.
राज्यातील इतरत्र जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी सुमारे १ हजार ३००च्या दरम्यान गुन्हे घडतात. त्यामुळे राष्ट्रीय गुन्ह्येगारीच्या तुलनेत आता रत्नागिरी मागे आहे, असे म्हणता येणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ४० हजाराच्या वर आहे; परंतु या जनतेचे संरक्षण करण्यासाठी फक्त १५७४ पोलिस कर्मचारी आहेत. नऊ तालुक्यांमध्ये सुमारे १८ पोलिस ठाणे आहेत. त्यामध्ये नऊ सागरी पोलिस ठाणे आहेत. वीजनिर्मितीतील कोयना धरण, आरजीपीपीएल कंपनी, जिंदाल या कंपन्यांबरोबर देशातील सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर (ता. राजापूर) येथे होऊ घातला आहे. आता बारसू येथे येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पामुळे वातावरण गरम असून पोलिसांचा ताण वाढला आहे. मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, मोर्चे, मारामारी किंवा जातीय तेढ, चोऱ्या, २४ तासाची ड्युटी, गस्त आदींमुळे पोलिस कर्मचारी हैराण होत आहेत.
या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वरिष्ठांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. बंदोबस्त आला तर या टोकाहून दुसर्‍या टोकाला जावे लागते. त्यामुळे पोलिस कर्मचारी प्रचंड तणावाखाली येतो. याचा परिणाम पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यावर होतो आहे. कमी मनुष्यबळाचा गुन्ह्यांच्या तपास कामावर परिणाम होत आहे. अनेक गुन्हे ‘अनडिटेक्ट’ आहेत. धावपळ, ताण, वरिष्ठांचा दबाव आदींमुळे पोलिसांच्या स्वास्थ्याचा व त्यामुळे गुन्हे शोधण्याच्या क्षमतेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या अनुषंगाने आणखी ११०० जादा पदे भरण्यात यावीत, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यापूर्वी दिला होता. त्यानुसार आता नव्याने १३१ पदांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याला गुन्हेगारीची मोठी पार्श्‍वभूमी नसली तरी कोकण रेल्वे, जलमार्ग, हवाईमार्ग, महामार्ग आदींमुळे मुंबई, पुणे, कर्नाटक, बेळगावसह परजिल्ह्यातील गुन्हेगार रत्नागिरीच्या आश्रयाला येऊ लागले. पश्‍चिम महाराष्ट्र किंवा अन्य जिल्ह्यातील एका पोलिसठाण्याचा वर्षाचा क्राईम रेट तो रत्नागिरी जिल्ह्याचा क्राईम रेट आहे.
त्यात यापूर्वी झालेल्या जिल्हा बदल्यांना मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील सुमारे १०० ते सव्वाशे कर्मचारी बदलून गेले; परंतु त्याच्या जागी अपेक्षित कर्मचारी मिळालेले नाहीत. पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतच आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची मानसिकता सांभाळत गुन्हेगारीला रोखण्याचे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षकांपुढे आहे.

---------------------
चौकट- २

...असे आहे पोलिस मनुष्यबळ

पोलिस अधीक्षक- १
अप्पर पोलिस अधीक्षक- १
डीवायएसपी- ४
पोलिस निरीक्षक- २३
अधिकारी सुमारे- ७०
सहाय्यक पोलिस निरीक्षक- २१
सहाय्यक पोलिस निरीक्षक- ३६
अलिकडेच हजर झालेले कर्मचारी- ४१
एकूण कर्मचारी- १५७४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com