देवरूखात दुकाने, बांधकामांचे जनरल ऑडिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूखात दुकाने, बांधकामांचे जनरल ऑडिट
देवरूखात दुकाने, बांधकामांचे जनरल ऑडिट

देवरूखात दुकाने, बांधकामांचे जनरल ऑडिट

sakal_logo
By

देवरूखात दुकाने, बांधकामांचे जनरल ऑडिट
व्यापारी संघटनेचा प्रस्ताव ; आपत्तीविरोधात व्यावसायिक एकवटले
साडवली, ता. १९ः आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी देवरूख व्यापारी संघटना एकवटली आहे. शहरात बाजारपेठेत आग लागली तर काय अनावस्था प्रसंग ओढवतो याचा अनुभव शहरवासीयांनी नुकताच घेतला. यासह वाहतूककोंडी आहेच. यावर विचारविनिमय करण्यासाठी येथील व्यापारी एकवटले आहेत. एका बैठकीत सर्व दुकानांचे, बांधकामांचे जनरल ऑडिट करावे असा विचार मांडण्यात आला. काही व्यापाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.
देवरूख शहराचा वाढता विस्तार पाहता देवरूख बाजारपेठेत अनेक गैरसोयी निर्माण होत आहेत. देवरूख नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा अजूनही कार्यान्वित झालेली नसल्याने गत आठवड्यात तीन दुकानांना आगीची वाढीव झळ बसली व व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले. या आधीही अशा आगीच्या घटना घडल्या आहेत. यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी बाबा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक झाली.
देवरूख बाजारपेठेतील काही व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर तर काही दुकाने स्वमालकीची आहेत. या सर्व दुकानांचे, बांधकामांचे जनरल ऑडिट करावे असा विचार मांडण्यात आला. यासाठी एक पाहणी कमिटी नेमून ठराविक प्रश्नावली तयार करण्याचे ठरले. यामध्ये जागा पाहणी, पाणीव्यवस्था, अग्निरोधक यंत्रणा, वीजमीटर, फ्रिझची क्षमता व केलेले वायरिंग, दुकान बंद करताना घेण्यात येणारी काळजी याची पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी त्या त्या विषयातील तज्ञ व्यापारी सहभागी होऊन रिपोर्ट तयार करणार आहेत. काही व्यापारी अग्नीरोधक यंत्रणा उपलब्ध करणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पाणी मिळावे यासाठी साठवण टाक्या तैनात करण्यात येणार आहेत. व्यापारी फंड तयार केला जाणार आहे तसेच व्यापारी पतसंस्थेत सर्वांना सभासद करून संकटकाळी अल्प व्याजदराने किंवा फक्त मुद्दल भरणे अशा स्वरूपात मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

चौकट
एक नवा पांयडा
व्यापारीवर्गाने एकजूट दाखवून आपल्यामुळे कुणाचे नुकसान नाही होणार याची काळजी घेऊन व्यापार केल्यास एक नवा पांयडा पाहायला मिळेल, असे ठरवण्यात आले. नगरपंचायतीकडे अग्निशमनसाठी निधी मंजूर झाला आहे. ही यंत्रणा लवकरात लवकर उभी राहावी यासाठी व्यापारी संघटना पाठपुरावा करणार आहे.