
मंत्री केसरकरांची पावले भाजपकडे
76768
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले. शेजारी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, इप्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, सायली दुभाषी आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
मंत्री केसरकरांची पावले भाजपकडे
प्रवीण भोसले ः प्रवेशात अडथळ्याच्या भितीने राणेंचे गोडवे
सावंतवाडी, ता. १९ ः दीपक केसरकर यांची पावले आता भाजपकडे पडू लागली आहेत; मात्र याला नारायण राणे यांनी हिरवा कंदील नाही दिला तर भाजपचे दार बंद होऊ शकेल, या भीतीमुळे केसरकर राणेंचे गोडवे गाऊ लागले आहेत; परंतु यामध्ये त्यांचा फक्त स्वार्थ आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.
हजारो महिलांचे कुंकू पुसणारे, नरकासुराचा वध केल्याशिवाय लक्ष्मी घरात येत नाही, राणेंना अशा प्रकारची उपमा देणाऱ्या केसरकरांचा हा ढोंगीपणा आता जनतेला कळाला आहे. फक्त कामापुरते गोड बोलायचे आणि नंतर विसरायचे. यांना जनता माफ करणार नाही, असेही भोसले म्हणाले. येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, सायली दुभाषी आदी पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘आघाडी सरकारमध्ये असताना केसरकर यांना मतदारसंघातील कामे करताना अडचणी येत होत्या; परंतु आता ते सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, मग येथील कामे का होत नाहीत? मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कुठल्या अडचणीत अडकून पडले आहे? कोणाच्या हट्ट्या पायी ते थांबले व कशापायी रखडले? हे जनतेला माहित आहे. त्यांनी जनतेच्या भावनेशी खेळू नये. गृहराज्यमंत्री असताना येथील पोलीस परेड ग्राउंडच्या नजीक असलेली चार एकर जागा शासनाच्या ताब्यात घेतली. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे भूमिपूजन झाले; मात्र आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, हे केसरकारांनी पहावे. मंत्रीपदात काय जादू असते, हे त्यांना आजपर्यंत कळलेच नाही. केवळ मंत्री होऊन चालत नाही तर लोकांची कामे करण्याची इच्छाशक्ती मनात लागते. ही इच्छाशक्ती केसरकारांकडेच नाहीच. कुठे आहे चष्मा कारखाना? एक लाख सेटअप बॉक्स? ही सगळी फसवेगिरी आहे. केवळ मंत्री, आमदार कसे व्हायचे हे केसरकर यांना माहित आहे. जनतेचे काहीच त्यांना पडलेले नाही.’’
श्री. भोसले पुढे म्हणाले, ‘‘आज ते शिक्षण मंत्री आहेत; मात्र एक तरी दौरा या ठिकाणी लावला का? केवळ घोषणा करायच्या आणि जनतेला उल्लू बनवायचे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी आखला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुकाही येतो. फक्त सावंतवाडी पालिका सोडली तर या व्यतिरिक्त केसरकरांनी दोडामार्ग आणि वेंगुर्लेला काय दिले. राज्यपालांना सावंतवाडीत आणून शिल्प ग्रामचे उद्घाटन त्यांनी केले; परंतु जो उद्देश ठेवून हे शिल्पग्राम सुरू केले होते, तो उद्देश केव्हाच पूसून टाकला आहे. एरव्ही राणेंना नरकासुर, राक्षस, कित्येक महिलांचे कुंकू पुसले असे उपमा देणाऱ्या आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर टीका करणारे केसरकर आज राणेंचेच गोडवे गात आहेत. त्यांच्यात हा बदल फक्त स्वार्थासाठी झाला आहे. त्यांची पावले हळूहळू भाजपकडे पडायला लागली असून ऐनवेळी नारायण राणेंनी विरोध केला तर आपल्याला भाजप प्रवेश अवघड होईल, यासाठीच ते आता त्यांच्यासोबत जुळवून घेऊ पाहत आहेत.’’
..............
चौकट
विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार
सावंतवाडी विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढविणार असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ती लढवणार आहोत. पक्षाकडे याबाबतची मागणी केली असून कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब यांना या ठिकाणी संधी येण्यात येणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघाचे बांधणीही सुरू केली आहे, असेही भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.