कसालमध्ये डेंगीचा उद्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसालमध्ये डेंगीचा उद्रेक
कसालमध्ये डेंगीचा उद्रेक

कसालमध्ये डेंगीचा उद्रेक

sakal_logo
By

कसालमध्ये डेंगीचा उद्रेक
१० रुग्ण सापडले; वजरेवाडीत ‘अलर्ट’

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः कुडाळ तालुक्यातील कसाल-वजरेवाडी येथे डेंगी बाधित १० रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून बाधित रुग्णांवर वेळीच उपचार सुरू करण्यात आले. स्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून या भागात साथ उद्रेक जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली.
कसाल-वजरेवाडी येथे सहा जानेवारीपासून किरकोळ तापाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. आरोग्य यंत्रणेमार्फत दोन दिवसांत नियमित रुग्ण सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात आढळलेल्या तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने संशयित हिवताप रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आले. मात्र, त्यामध्ये एकही रुग्ण हिवताप दूषित आढळलेला नाही. वझरेवाडी येथील ११ रुग्णांचे रक्तजल नमुने डेंगी, चिकनगुनिया निदानासाठी एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १० रुग्ण डेंगी बाधित आढळले आहेत. हे सर्व बाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत; मात्र जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ सुरू केल्या आहेत. बाधित भागात प्रतिबंधात्मक कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात आली. साथ उद्रेक जाहीर केलेल्या वजरेवाडी येथील ४४ घरांमधून दूर फवारणी करण्यात आली आहे. डास उत्पत्तीस्थानात गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. बाधित भागासोबतच संपूर्ण गावात सर्वेक्षण केले आहे. डासअळी कमी करण्यासाठी कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. रुग्ण संख्येत वाढ होऊ नये, यासाठी खबरदारी घेताना अतिदक्षता म्हणून कसाल-वझरेवाडी भागात साथउद्रेक जाहीर करण्यात आले. तेथे आवश्यक औषध साठा व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आरोग्य विभाग आवश्यक ती खबरदारी व कार्यवाही करत आहे, अशी माहिती यावेळी डॉ. कर्तस्कर यांनी दिली.

कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात डेंगीचे रुग्ण आढळल्याने त्या ठिकाणी साथ उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या भागात तापाचे रुग्ण असल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घ्यावेत. वेळीच उपचार घेऊन ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- डॉ. रमेश कर्तस्कर, जिल्हा हिवताप अधिकारी