दोडामार्ग, आंबोलीत पर्यटन निगडीत उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग, आंबोलीत पर्यटन निगडीत उपक्रम
दोडामार्ग, आंबोलीत पर्यटन निगडीत उपक्रम

दोडामार्ग, आंबोलीत पर्यटन निगडीत उपक्रम

sakal_logo
By

76865
सावंतवाडी ः येथे आयोजित बैठकीला उपस्थित वन अधिकारी व ग्रामस्थ.


दोडामार्ग, आंबोलीत पर्यटन निगडीत उपक्रम

वनविभागाची माहिती; पर्यटकांसाठी होणार खुले

सावंतवाडी, ता. १९ ः दोडामार्ग व आंबोली राखीव वनक्षेत्रात तथा आंबोली वनपरिक्षेत्रात आता वन्यजीव पर्यटन आणि जंगल पर्यटन निगडीत विविध उपक्रम अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. याबाबत गुरुवारी वन विभागातर्फे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्यासह उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आदी अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
दोडामार्ग, आंबोली वनपरिक्षेत्रात विविध वन्यजीवांसह जैवविविधतेने भरलेले जंगल परिसर असल्याने या वनपरिक्षेत्राला राज्यातील महत्त्वाच्या वनक्षेत्रांपैकी मानले जाते. या परिसरात वन्यजीव पर्यटन सुरू व्हावे, यासाठी नेहमी मागणी होत असते. आंबोली हे पर्यटनस्थळ पावसाळी पर्यटन हंगामातील केवळ २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत धबधबे व निवडक पॉईंटसाठी प्रसिद्ध आहे. इतर हंगामात येथे पर्यटकांची पाठ असते. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवतो. आंबोली परिसरासह चौकुळ, गेळे आणि आजूबाजूच्या गावांतही पर्यटनदृष्ट्या वाढ व्हावी आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी आंबोली टुरिझममार्फत विविध स्तरावर करण्यात येत होती. आता दोडामार्ग-आंबोली राखीव वनपरिक्षेत्रात तथा आंबोली वनपरिक्षेत्रात शासनाच्या पर्यटनवाढ व रोजगार संधी निर्माण होण्यासाठीच्या अध्यादेशानुसार या वनपरिक्षेत्रांतील गावांतील स्थानिक, व्यावसायिक आणि वनविभाग यांच्यामार्फत अधिकृत वन्यजीव पर्यटन, जंगल भ्रमंती व जंगल सफर करता येणार आहे.
आज झालेल्या बैठकीत वन्यजीवांकडून होणारे शेतीचे नुकसान, पूर्वजात जमिनींना विविध कारणांनी वन विभागकडून होणारा त्रास, आंबोली वनविभागाचा मनमानी कारभार यावर उपस्थित ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वन विभाग व ग्रामपंचायत यांच्या असलेली वनसंमतीला विश्वासात न घेता तथा माहिती न देता परस्पररित्या आंबोली वन विभागातर्फे होणाऱ्या संशयास्पद कामांवर सरपंच सावित्री पालेकर यांनी मुख्य वनसंरक्षकांचे लक्ष वेधले. यावेळी विविध कार्यकारी सोसोयटी चेअरमन शशिकांत गावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उल्हास गावडे, झिलू गावडे, सुनील नार्वेकर, संतोष पालेकर, नमिता राऊत, दिलीप सावंत, पंच सदस्य महेश पावसकर, काशिराम राऊत आदी उपस्थित होते.