आराम बस उलटून दोन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आराम बस उलटून दोन ठार
आराम बस उलटून दोन ठार

आराम बस उलटून दोन ठार

sakal_logo
By

७६८६९,
कणकवली ः महामार्गावरील गुरुवारी अपघातग्रस्त झालेली खासगी बस.

७६८७०
कणकवली ः येथील रुग्णालयात जागा नसल्याने काही जखमींना आवारात गाद्या ठेवून उपचार करण्यात आले.

आराम बस उलटून दोन ठार
हळवल फाट्यावर अपघात; मृतात झरेबांबरमधील महिला, १५ गंभीर
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः चालकाचे नियंत्रण सुटून गोव्याकडे जाणारी खासगी आराम बस आज पहाटे उलटून दोघे ठार झाले. यात १५ प्रवासी गंभीर, तर १३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात शहरालगतच्या महामार्गवरील हळवल फाट्यावर झाला. शैलेजा प्रेमानंद माजिक (वय ५६, रा. झरेबांबर, ता. दोडामार्ग) आणि अण्णा गोविंद नाळे (५२ रा. फलटण, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर काहींवर खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमींसह अन्य १७ जणांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती अशी ः रामदास देविदास मांजरे (४०, रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद) बस (ए.आर. १६ ए ७२७७) घेऊन पुणे ते गोवा असे येत होते. महामार्गावरील उड्डाणपुलावरून हळवल फाट्यावरील तीव्र वळणावर आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. बस उलटली. प्रवासी साखर झोपेत असताना अपघात झाल्याने ४० पैकी ३० प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. बस उलटून घसरत गेल्याने खिडकीच्या काचा फुटल्या. त्यामुळे प्रवाशांचे डोळे, चेहरा, हातापायांना दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात आरडाओरड झाला. त्यामुळे वागदे येथील रोहित गावडे आणि सोहम कामत तातडीने अपघातस्थळी आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शैलेजा प्रेमानंद माजिक आणि अण्णा गोविंद नाळे यांचा मृत्यू झाला. शैलजा या दोडामार्ग येथे, तर अण्णा नाले साताऱ्याहून गोव्याला जात होते. हरिदास कऊबा कारकर (३५ रा. हडपसर, पुणे), स्नेहल रवींद्र वाखाटे (३५ रा. शिरूळ, पुणे), अक्षय गुंडू वरपे (२७), धनश्री अक्षय वरपे (२४, दोघे येरवडा, पुणे), माया विलास पवार (वय ४४), सौरभ गजानन दळवी (२४), गोपाळ पदमराज सावंत (२२), गंगाधर मारुती रंडाळे (२३), देवानंद जगदेश शिरसाट (३९), माधवी चाँद वजीरमुल्ला (४०, सर्व पुणे), आसिफ हनीसाब शेख (२८), अनिता अॅन्थोनी बरवा (४८), फरिन आसीफ शेख (२३), मोहमंद सैयद (३४), संदीया शेख (३८) रवींद्र लघू वाखाटे (३०), सोनू पवार (३१, सर्व गोवा), राजाराम पाल (२० रा. जयपूर, राजस्थान), धनराज गोविंद गायकवाड (५० रा. ओरोस), मधू लकडा (२८), अविनाश गुप्ता (३०), रामनाथ रजत (३१, सर्व), प्रेमानंद भिवा भाजी (६६, रा. दोडामार्ग), लवूचंद मनोहर सूर्यवंशी (३२, रा. बारामती), अनिल महादेव रास्कर (४८, नगर), सहदेव कृष्णा बहिरे (३८, बांदा), शामकुमार साऊ मगर (४८, नेपाळ), शांतू किशोर पवार (२०, रा. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
चालक रामदास यांना किरकोळ दुखापत झाली. काही जखमींना येथे उपचार करून सायंकाळी सोडून देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या तसेच खाजगी रुग्णवाहिका आल्यानंतर प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, निरीक्षक अनिल जाधव यांचे तसेच वाहतूक शाखेचे पथक दाखल झाले. चालक रामदास यांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


वेळ टळली असती तर...
खासगी बसमधील काही प्रवाशांना कणकवली शहरात न उतरवता त्या प्रवाशांना जानवली पुलावर उतरविण्यात आले. त्यानंतर पुढे भरधाव वेगाने उड्डाण पुलावरून बस निघाल्याने हा अपघात झाला. प्रवाशांना शहरातील बसस्थानाकासमोर उतरवले असते तर कदाचित अपघात टळला असता.

अपघातांची मालिका
गडनदी पुलावरील या तीव्र वळणार अपघातांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत येथे झालेल्या अपघातातील वाहने अशा पद्धतीने पलटी होत आहेत. याचे कारण वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे उपाययोजना नाहीत. यंदा गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी नरडवे गावातील एकाचा जीप अपघातात जागीच मृत्यू झाला होता. रस्त्याची एक लेन नसल्याने तो अपघात झाल्याने त्या दिवशी नागरिकांनी चार तास रास्ता रोको केला होता. त्यानंतर महिन्याभरात रस्त्याची दुसरी मार्गिका सुरू झाली; पण अजूनही तेथे पक्का रस्ता झालेला नाही. त्यामुळे नागरिक, महसुली अधिकारी, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा झाली. त्यावेळी या वळणार गतिरोधक बसवण्याचे मान्य झाले; पण काहीही हालचाल झाली नाही. वेगावर नियंत्रण येत नसल्याने अपघात मालिका सुरू आहे.
----------------