
अंमली पदार्थांची छुपी वाहतूक, तस्करी वाढतेय
पोलिसदलापुढील आव्हान - भाग २ ...लोगो
..................
अंमली पदार्थांची छुपी वाहतूक, तस्करी वाढतेय
विळख्यात तरुण पिढी; परराज्यातही कनेक्शन
राजेश शेळकेःसकाऴ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः जिल्ह्यात गुन्हेगारी हातपाय पसरत असताना अंमली पदार्थांचा विळखा अजून घट्ट होत चालला आहे. तरुण पिढी यात गुरफटत आहे. रत्नागिरी शहर आणि परिसर त्याचे मुख्य केंद्र असून अनेक वर्षांपासून अंमली पदार्थांची ही छुपी वाहतूक किंवा तस्करी सुरू आहे. गांजा, चरस, टर्की पावडर यास मेथ्यॅक्युलॉन (एमडी) सारख्या अंमली पदार्थांचे सेवन झिंग येण्यासाठी केले जात असल्याचे अनेकवेळा उघड झाला आहे. थेट अंतरराष्ट्रीय टोळींशी संबंध असल्याचा प्रकारही ग्रामीण पोलिसांनी उघड केला होता; परंतु अशा कोणत्याही प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचणे किंवा रत्नागिरीतील त्याची छुपी वाहतूक रोखण्यास पोलिस अजूनतरी असमर्थ ठरले आहेत.
काही वर्षांपूर्वी शहरात टोळी युद्ध भडकत होती तेव्हा नशेसाठी या टोळ्यांमधील अनेक गर्दुले गांजाचे मोठ्या प्रमाणात सेवन करून झिंगीत अनेक गुन्हे करत होते; परंतु कालांतराने ते हळुहळू टोळी युद्धच कमी होत गेली; परंतु गांजाची छुपी वाहतूक सुरूच राहिली. बेळगाव, कर्नाटक, कोल्हापूर आदी भागांतून हा गांजा येत राहिला. त्यानंतर हळुहळू चरस आणि टर्की पावडरची लत तरुणांना लागली. त्याचीही मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू झाली. एक, दोन ग्रॅमच्या पुड्या तयार करून त्या काही ठिकाणी १०० किंवा २०० रुपयाला विकण्यास सुरवात झाली. मद्यापेक्षा कमी किमतीत चांगली नशा येऊ लागल्याने तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटत गेली. पोलिसदलाकडून यावर तात्परती कारवाई होत होती. कारवाई झाली की, काही दिवस हे प्रकार थांबायचे; परंतु काही तरुणांना त्याची एवढी सवय झालेली असायची की, झिंग येण्यासाठी अंमली पदार्थ नाही मिळाले, तर मेडिकमधील कफसिरप किंवा अन्य काही गोळ्या, व्हाईटनर आदींचाही वापर करू लागले.
एकदा तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही तरुण मेडिकलमध्ये कफशिरप घेण्यासाठी गेले होते; परंतु मेडिकल मालकांनी देण्यास नकार दिल्यावर अक्षरशः त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवली होती. एवढ्या थराला हे गर्दुले जात असल्याचा प्रकारही घडला आहे. शहर आणि परिसरात याचे प्रमाण वाढल्यानंतर एका खासगी टीव्ही वाहिनीने अंमली पदार्थांच्या राजरोस विक्रीचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बैलबाग परिसरात कारवाई केली होती.
आतापर्यंत या परिसरातच मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अंमली पदार्थांची विक्री समूळ नष्ट करण्याचा निर्धार करत कारवाईचा धडाका लावला. यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीला काही प्रमाणात प्रतिबंध बसला होता; मात्र त्यांच्या बदलीनंतर शहरात पुन्हा अंमल पदार्थांची छुप्या मार्गाने आयात सुरू झाली. एका वडापच्या गाडीमधून अंमली पदार्थ आणल्याचे उघड झाले. ग्रामीण पोलिसांनी तर पंजाब व गोव्याशी कनेक्शन असल्याची कारवाई केली होती. यामध्ये अंमली पदार्थसदृश पावडर मोठ्या प्रमाणात सापडली होती.
चौकट
उच्च प्रतिच्या मेथ्यॅक्युलॉन (एमडी)ची विक्री
शहरातील एका लॉजवर शहर पोलिसांना उच्च प्रतिचा मेथ्यॅक्युलॉन (एमडी) अंमली पदार्थ सापडला होता. या प्रकरणी केरळच्या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या रूमची झडती घेतल्यानंतर त्यांच्या बॅगेत ९९ ग्रॅमचे मेथ्यॅक्युलॉन पावडर सापडली. सुमारे ४ लाख ९५ हजार या अंमली पदार्थाची किंमत आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात हे दोन्ही तरुण केरळमधील असल्याची माहिती तेव्हा मिळाली होती. परराज्यातील काही लोक रत्नागिरीत रेकी करून त्यानंतर माहिती घेऊन अंमली पदार्थांची राजरोक विक्री करत असल्याचे हे प्रकार उघड झाले आहेत.