राजापूर-सभासद सहकार पॅनेललाच निवडून देतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सभासद सहकार पॅनेललाच निवडून देतील
राजापूर-सभासद सहकार पॅनेललाच निवडून देतील

राजापूर-सभासद सहकार पॅनेललाच निवडून देतील

sakal_logo
By

सभासद सहकार पॅनेललाच निवडून देतील
अनिल ठाकूरदेसाई; नव्या उमेदवारांना दिली संधी

- राजापूर अर्बन बॅंक निवडणूक - लोगो

राजापूर, ता. २०ः सहकारामध्ये राजकारण न आणण्याच्या उद्देशाने गेली २७ वर्षे सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या माध्यमातून राजापूर अर्बन बँकेवर सर्व मंडळी निःस्पृह भावनेतून कार्यरत आहेत. बँकेने केलेली प्रगती, झालेला कार्यविस्तार आणि सभासदांचा विश्वास हीच सहकार पॅनेलची खरी विश्वासार्हता आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्येही केलेल्या कामाची पोचपावती देत सभासद सहकार पॅनेलला निवडून देतील, असा विश्वास सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
राजापूर अर्बन बँकेची निवडणूक होत असून त्यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सहकार पॅनेलच्या सुकाणू समितीप्रमुख ठाकूरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सहकार पॅनेलच्या नेतृत्वाखाली बँकेने आजपर्यंत साधलेली प्रगती, सहकार पॅनेलची भूमिका आदींविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शतकमहोत्सवी परंपरा असलेली राजापूर अर्बन बँक ही समस्त राजापूरवासीयांची अस्मिता आहे. बँकेच्या माध्यमातून सामान्य सभासदांना न्याय देण्याचा आणि त्यांचं हित जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापूर्वीच्या आणि गेली २७ वर्षे बँकेवर काम करणाऱ्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या माध्यमातून बँकेची झालेली प्रगती सभासदांपुढे असून या केलेल्या कामाची पोचपावती याही निवडणुकीत निश्‍चितच सभासद देतील यात शंका नाही.
बँकेच्या शाखांचा झालेला विस्तार, आधुनिक सेवाप्रणाली, एटीएम सुविधा अशा अनेक ग्राहकोपयोगी सेवा बँकेने सुरू केल्या आहेत. दोन नवीन शाखांना मंजुरी मिळाली आहे. सहकार पॅनेलमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष यांचा समावेश असून त्यामध्ये जुन्यांबरोबरच काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजप पक्ष म्हणून पॅनेलमधील भाजप उमेदवारांच्या व पॅनेलच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार पॅनेलची निर्मिती करताना काही राजकीय पक्षांशी संपर्कही साधल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी परिवर्तन पॅनेलमधील सर्व मंडळी आपलीच मंडळी असून लोकशाहीत निवडणूकीच्या माध्यमातून प्रत्येकाला सामोरे जाण्याचा अधिकार आहे.
कोरोना काळात काही कर्जांबाबत बँकेने आरबीआयच्या आदेशाप्रमाणे केलेल्या तरतुदीबाबत अप्रचार केला जात आहे; मात्र, तो अत्यंत चुकीचा असून कोरोना काळात आरबीआयच्या आदेशाप्रमाणे केलेली ती तरतूद असून कोणत्याही प्रकारे कुठल्याही कर्जदाराला बँकेने सवलत दिलेली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शैक्षणिक कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांकडून दिले जात असून त्यांचे व्याजदरही कमी आहेत. मात्र, तरीही अर्बन बँकेमार्फत सभासदांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देता यावे यासाठी आरबीआयकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती ठाकूरदेसाई यांनी दिली.