
महाराष्ट्राकडे लिडरशिप करण्याची ताकद
77408
सावंतवाडी ः येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलताना प्रकाश पवार.
महाराष्ट्राकडे लिडरशिप करण्याची ताकद
प्रकाश पवार : ‘सांस्कृतिक राजकारण’वर सावंतवाडीत व्याख्यान
सावंतवाडी, ता. २२ ः महाराष्ट्राला मध्यम मार्गी कल्चर असल्याने महाराष्ट्राला देशाची लिडरशिप करण्याची ताकद आहे, असे मत कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश पवार यांनी येथे व्यक्त केले. श्रीराम वाचन मंदिरच्या वतीने आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या समारोपात ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘सांस्कृतिक राजकारण’ हा होता. या वेळी अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई तसेच प्रसाद पावसकर, रमेश बोंद्रे, संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर आदी उपस्थित होते.
या वेळी प्रकाश म्हणाले, ‘‘भारताचे कल्चर मध्यम मार्गी आहे. येथील मातीत, पाण्यात ते रुजले आहे. महाराष्ट्रात हे कल्चर शतकानुशतके आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशाची लिडरशिप करू शकतो. कारण महाराष्ट्रात हे कल्चर आहे. महाराष्ट्राला मध्यममागी दृष्टिकोन आहे. येथील विचारसरणी मध्यममार्गी आहे. येथील कल्चरही मध्यममार्गी आहे. प्रभाकरपंत कोरगावकरांसारख्या उद्योगपतींनी आपली संपत्ती समाजासाठी दान केली. म्हणजेच भारताच्या मातीत, पाण्यात, विचारसरणीत, घराघरांत खोलवर रुजले आहे. घरामध्ये तुम्ही टोकाला गेला तरी अखेर मध्यममार्गावरच येऊन उपाय काढता. भारताचे लोकेशन, संस्कृती, पर्यावरण मध्यममार्गी प्रकृतीचे आहे. गंगा-जमुना संस्कृतीला मर्यादा आहेत. या संस्कृतीला महाराष्ट्र तोड देऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या आणि गंगा-जमुना संस्कृतीत प्रचंड फरक आहे. समाजवादी आणि गांधी विचाराच्या मंडळींनी महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर याबाबतचे वर्कआऊट केले होते. या संस्कृत्या वेगळ्या असल्या तरी त्या मध्यममार्गी आहेत. काश्मिरमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथा, महाराष्ट्रातील कथा, पश्चिम बंगालमधील कथा याचे अर्थ वेगवेगळे लागतात; मात्र महाराष्ट्रातील कथा आशय देणाऱ्या आहेत. आपल्याकडे तुळजाभवानीला युद्धदेवता म्हणून मानले जाते; परंतु ती युद्धदेवता नाही, तर ती मंगळागौरी आहे. मंगळागौरीचा उत्पादन पद्धतीचे ‘सुजलम्म सुफलाम’चे प्रतीक आहे. तुमची शेती पिकली की ती घरात येते. तिची पूजा होते. पश्चिम बंगालमधील देवी कालिमाता आहे. कालिमातेचे प्रतीक वेगळे आहे. ती डायरेक्ट युद्धाला तयार असणारी देवता आहे. म्हणूनच महाराष्ट्र देशाचे लिडरशिप करू शकतो. कारण त्याला मध्यममार्ग कल्चर आहे, दृष्टी आहे. मध्यम मार्गाने कसे जायचे, याची विचारसरणी आहे. विचारसरणी मोडता मोडत नाही. ती मोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; परंतु त्यांना ते साध्य झाले नाही. मध्यम मार्ग कल्चर प्रत्येकाच्या घरोघरी आहे. ते समजण्याची गरज आहे. हे कल्चर सार्वजनिक जीवनात आणि धार्मिक जीवनातही आहे.’’
---
मध्यम मार्ग सामाजिक सलोख्याचे प्रतीक
ते पुढे म्हणाले, ‘‘सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणजे मध्यम मार्ग. यालाच ‘सोशल हार्मोनी’ म्हटले जाते. महात्मा गांधी सोशल हार्मोनीबद्दल बोलत होते. म्हणजेच मध्यम मार्गाबद्दल बोलत होते. हे कल्चर जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज यांनी मध्यम मार्ग स्वीकारला होता. भाऊसाहेब बांदोडकरांना गोवा स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्याची इच्छा होती; मात्र त्यांनी माध्यम मार्ग स्वीकारत जनमत घेतले. म्हणजेच लोकांचे मत विचारात घेणे, लोकांना बरोबर घेऊन जाणे यालाच ‘मध्यम मार्ग’ म्हणतात. मध्यम मार्गानेच आपल्या देशाने वाटचाल केली आहे. यातूनच प्रगती साध्य होते. डाव्या विचारसरणीचे किंवा उजव्या विचारसरणीचे असो, सर्वांनीच आपल्याकडे मध्यम मार्गानेच वाटचाल करण्याचा प्रयत्न केला.